सुरक्षारक्षक जोशी बंधू भरवितात वन्यजिवांना प्रेमाचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:16+5:302021-05-30T04:05:16+5:30
खुलताबाद येथील जोशीबंधू देतात दररोज वन्यजिवांना अन्नपाणी देवगिरी किल्ला बंद असल्याने वन्यप्राण्यांवर उपासमार : अनेकांनी दिला मदतीचा हात सुनील ...
खुलताबाद येथील जोशीबंधू देतात दररोज वन्यजिवांना अन्नपाणी
देवगिरी किल्ला बंद असल्याने वन्यप्राण्यांवर उपासमार : अनेकांनी दिला मदतीचा हात
सुनील घोडके
खुलताबाद : कोरोना महामारीमुळे दौलताबादचा देवगिरी किल्ला बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे किल्ला परिसरातील हजारो वन्यप्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही गंभीर बाब किल्ल्याचे सुरक्षारक्षक जोशी बंधू यांच्या लक्षात येताच त्यांनी मित्र परिवाराकडे मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला येथील तरुणांनी साद दिल्याने जोशी बंधू हे कित्येक महिन्यांपासून येथील वन्यप्राण्यांना प्रेमाचा घास भरवीत आहेत.
देवगिरी किल्ल्याच्या परिसरात शेकडो एकर जंगल आहे. त्यामुळे येथील परिसरात जंगली प्राणी, पशुपक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. किल्ला उघडा असल्यावर येथे नियमित हजारो पर्यटक भेट देतात. त्यावेळी वानर व अन्य प्राण्यांना अन्नाची सोय होत असते. परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे सर्व काही बंद झाले. त्यामुळे किल्ला परिसरातील वन्यप्राण्यांना काहीच खाण्यास मिळत नव्हते. हे विदारक चित्र सुरक्षारक्षक महेंद्र जोशी व मकरंद जोशी या भावांच्या लक्षात आले.
त्यांनी आपल्या मित्रांसमोर ही व्यथा मांडली. शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला मित्र परिवाराकडून प्रतिसाद मिळू लागला. दररोज खुलताबाद येथील युवक हे जोशी बंधूंना बिस्कीट, चिप्स, केळी, शेंगदाणे, बटरपाव, तोस, शिळ्या भाकरी, तांदूळ, बाजरी यासह इतर खाद्य वस्तूंची मदत करू लागले. किल्ला परिसरात सकाळी जोशीबंधू गेले तर शेकडो वानर, खारूताई, मोर वाट बघत असतात. दररोज मिळालेली अन्नधान्याची मदत ते घेऊन जातात व ती मुक्या प्राण्यांना आपल्या हातांनी खाऊ घालतात.
चौकट
आग लागल्याने वनसंपदा नष्ट
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच किल्ला व आजूबाजूच्या परिसरात आग लागली होती. तेव्हा वनसंपदा जळून खाक झाली. झाडाझुडपांचा पाला खाऊन काही वन्यप्राणी आपल्या पोटाची खळगी भरीत असत. परंतु, सगळेच उद्ध्वस्त झाले. पाणीसाठे आटले. त्यामुळे वन्यप्राणी सुरक्षारक्षकांच्या आजूबाजूला रेंगाळत असे. हाकलून लावले तरी ते जात नव्हते. काही तरी खाण्यास देण्याची त्यांची मागणीच म्हणावी लागेल. जोशी बंधूंनी त्यांच्यावर मायेचा हात फिरवीत दिलासा दिला.
--
या तरुणांनी केला मदतीचा हात पुढे
सागर सावजी, रवींद्र सावजी, सुजित जोशी, संतोष सावजी, केदार सावजी, सुहास सावजी, दिनेश सावजी, मनोज चव्हाण, राजू पवार, किरण भावसार, भूषण चौधरी, मनोज शिंपी, उमेश सावजी, नीलेश चव्हाण, आशिष कुलकर्णी, किशोर भावसार, दिनेश कायस्थ, नागेश कायस्थ, अविनाश कुलकर्णी, मनोज पिंपळे या दौलताबाद येथील युवकांनी वन्यप्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.
--
फोटो :