चोरट्यांची हिंमत बघा; ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या शेतातूनच पळवल्या तीन बकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 12:16 PM2022-01-27T12:16:47+5:302022-01-27T12:17:34+5:30
पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शेत आहे.
जायकवाडी ( औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील शेतमजुराच्या तीन बकऱ्या सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कातपूर शिवारातील गट क्रमांक ६७ मध्ये मंत्री अशोक चव्हाण यांची शेती आहे. त्यांच्या शेतात गेल्या वीस वर्षांपासून गणेश अभंग हे आई-वडिलांसोबत शेतमजुरी करतात. गणेश अभंग हे तेथेच शेतवस्तीवर राहतात. शेतवस्तीवरील घराच्या पाठीमागे त्यांनी जनावरे बांधण्यासाठी गोठा बनविलेला आहे. सोमवारी रात्री या गोठ्यातून गणेश अभंग यांच्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच येथून थोड्या अंतरावर असलेल्या दीपक मोरे यांच्या शेतवस्तीवर ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्यांमधून तीन मोबाईलदेखील लंपास करण्यात आले आहे.
या प्रकरणी गणेश अभंग यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहेत.