राज ठाकरेंसमोर रिकाम्या खुर्च्या; भाषण थोडक्यात उरकून केला 'जय महाराष्ट्र'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 05:33 PM2020-02-15T17:33:49+5:302020-02-15T19:00:29+5:30
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोशिएशन (मेस्टा) संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले
औरंगाबाद : हजारो, लाखोंच्या उपस्थितीत सभा गाजविण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना रिकाम्या खुर्च्या पाहून भाषण आटोपते घेण्याचा प्रसंग औरंगाबादेत ओढावला.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोशिएशन (मेस्टा) संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेतील श्रीहरी पव्हेलियन येथे शनिवारी (दि.१५) दुपारी साडेबारा वाजता झाले. या अधिवेशनाला दहा हजारांपेक्षा अधिक संस्थाचालक, शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले होते. राज ठाकरे यांचे सभागृहात आगमन झाल्यानंतर पाठीमागे बसलेल्या लोकांना पुढे बोलावण्यात आले. त्यामुळे व्हिआयपींसाठीच्या केलेल्या व्यवस्थेच्या पाठिमागे हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या. समोरील रिकाम्या खुर्च्यांचे चित्र पाहताच राज ठाकरे यांनी तात्काळ दिपप्रज्वलन केले.
संयोजकांनी सत्कार करताच त्यांनी स्वत:हून माईकचा ताबा घेतला. या अधिवेशनाचे आमंत्रण मिळालेले नव्हते. माझ्या नियोजित दौऱ्यात त्याचा समावेशही नव्हता. तरीही काही लोकांच्या आग्रहामुळे याठिकाणी शुभेच्छा देण्यात आलो आहे, असे स्पष्ट करत त्यांनी अवघ्या अडीज मिनिटात भाषण आटोपते घेतले. भाषण संपवताच त्यांनी व्यासपीठही सोडले. मात्र राज ठाकरे यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये या अधिवेशनाचा उल्लेख असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. रिकाम्या खुर्च्याविषयी माहिती देताना स्वागताध्यक्ष शिरिष बोराळकर म्हणाले, इंग्रजी शाळांचे संस्थाचालक राज्याच्या कानाकोपऱ्यातुन येणार असल्यामुळे उशिरा पोहचतील. त्यामुळे गर्दी झाली नाही. सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व संस्थाचालक पोहचतील असेही त्यांनी सांगितले.