कैलास लेणी पाहून ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक झाले थक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:06 AM2018-06-24T06:06:30+5:302018-06-24T06:06:52+5:30

आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस हे शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहून थक्क झाले.

Seeing the Kailas Caves, 'Amazon was the founder of Thaak! | कैलास लेणी पाहून ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक झाले थक्क!

कैलास लेणी पाहून ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक झाले थक्क!

googlenewsNext

नजीर शेख/रमेश माळी
औरंगाबाद/वेरुळ : आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस हे शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहून थक्क झाले. कैलास लेणी पाहून त्यांनी ‘ओह अमेझिंग’ असे उद्गार काढले.
खाकी रंगाची बर्म्युडा आणि पांढरा शर्ट घातलेले जेफ बेजोस हे सुमारे दोन तास वेरूळ लेण्या पाहण्यात दंग झाले होते. ते खास वेरूळ लेण्या पाहण्यासाठीच आले होते. त्यांनी सर्वसाधारण पर्यटकांप्रमाणे आनंद लुटला. त्यांनी वेरूळ येथील १०, १५, १६ (कैलास लेणी) आणि ३२ क्रमांकाची लेणी पाहिली. त्यांच्यासोबत काही सुरक्षारक्षक होते, अतिविशेष सुरक्षाव्यवस्था नव्हती. ते वेरूळ येथे येत असल्याबाबतचा कुठलाही प्रोटोकॉलही नव्हता. ते आणि त्यांचे कुटुंबीय बराच वेळ फोटो काढण्यात दंग होते. गाईड अलीम कादरी यांनी त्यांना लेण्यांची माहिती दिली. जेफ बेजोस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मॅकेंझी टटल, तीन मुले व एक मुलगी होती. सुरक्षा रक्षकांमुळे ते ‘व्हीआयपी’ पाहुणे असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येत होते. मात्र त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणेच वावरण्यामुळे त्यांनी इतरांना प्रभावित केले. त्यांनी काही पर्यटकांशी संवादही साधला. दुपारी दोन ते ४.३० पर्यंत ते तेथे होते.

आलिशान विमानाने प्रवास
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस हे शनिवारी आपल्या आलिशान खासगी विमानाने नागपूर येथून ते दुपारी औरंगाबादमध्ये दाखल झाले. खासगी वाहनांनी ते वेरूळ लेणीला गेले. सायंकाळी औरंगाबादहून ते पुन्हा खासगी विमानाने वाराणसीसाठी रवाना झाले. जगभरातील महागड्या विमानांमध्ये जेफ बेजोस यांच्या विमानाची गणना होते.

जेफ बेजोस यांनी लेणींना भेट देण्यापूर्वी या लेण्यांचा अभ्यास केल्याचे समजते. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी समजून घेतले आणि नंतर लेण्यांना भेट दिली. त्यांच्या वतीने त्यांच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळ, वेरूळ लेणी परिसराची रेकी केली होती.

२० वर्षांपूर्वीही दिली होती भेट
जेफ बेजोस २० वर्षांपूर्वी एकटेच वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. अर्थातच तेव्हा त्यांची अ‍ॅमेझॉन कंपनीही नव्हती. त्या आठवणी त्यांनी जागविल्या.

मुंबईहून आली आलिशान वाहने
वाहनातून प्रवास करताना जेफ बेजोस आणि त्यांच्या कुटुंबाची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यासाठी औरंगाबादेतील वेरूळ लेणीपर्यंत प्रवास करण्यासाठी एका कंपनीतर्फे मुंबईहून सुविधांनी सज्ज अशी दोन खासगी वाहने मागविण्यात आली होती.

दौलताबाद
किल्ल्याची छायाचित्रे
जेफ बेजोस आणि त्यांच्या मुलांनी दौलताबादच्या घाटातून ऐतिहासिक तटबंदी असलेल्या किल्ल्याचीही छायाचित्रे घेतली. त्यांच्या एका मुलाच्या गळ्यात कॅमेरा होता. वेरूळ आणि अजिंठा लेणी येथे त्याने विविध अँगलद्वारे लेण्यांची व कुटुंबीयांची छायाचित्रे घेतली.
वेरूळहून औरंगाबादकडे येण्यासाठी हे कुटुंब निघाले. वाटेत दौलताबाद घाटात मोठ्या वळणावर (जेथून दौलताबाद किल्ल्याचे मनोहारी दृश्य दिसते) बेजोस यांनी वाहन थांबविण्यास सांगितले. वाहनातून उतरून बेजोस यांनी किल्ल्याची छायाचित्रेही घेतली.

जेफ बेजोस यांचे
पाच तास
शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी जेफ बेजोस औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर आले.
१.०५ वा. - वेरुळला जाण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दोन आलिशान वाहनांमध्ये बसले.
२.०५ वा. - वेरुळ लेणी येथे पोहोचले.
४.३० वा. - वेरुळ लेणीहून औरंगाबाद विमानतळाकडे निघाले.
५. ४० वा. - औरंगाबाद विमानतळावर आगमन.
६.०० वा. - खासगी विमानाने वाराणसीकडे रवाना.

Web Title: Seeing the Kailas Caves, 'Amazon was the founder of Thaak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.