कैलास लेणी पाहताच जेफ बेजोस यांनी उच्चारले... ‘ओह अमेझिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:41 AM2018-06-24T06:41:17+5:302018-06-24T08:41:00+5:30
सामान्य पर्यटकांसारखा वावर : जगप्रसिद्ध अॅमेझॉन कंपनीच्या संस्थापकांची वेरूळ लेणीला भेट
नजीर शेख/रमेश माळी
औरंगाबाद/वेरुळ : आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस यांनी शनिवारी दुपारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहिल्या. कैलास लेणी पाहताच त्यांच्या तोंडून ‘ओह अमेझिंग’ असे शब्द उमटले.
जेफ बेजोस हे सुमारे दोन तास वेरूळ येथील लेण्या पाहण्यात दंग होऊन गेले होते. खाकी रंगाची बर्म्युडा आणि पांढरा शर्ट या पेहरावातील बेजोस हे खास वेरूळ लेण्या पाहण्यासाठीच आले होते. या भेटीत बेजोस यांनी सर्वसाधारण पर्यटकांप्रमाणे लेणी पाहण्याचा आनंद लुटला. त्यांनी वेरूळ येथील १०, १५, १६ (कैलास लेणी) आणि ३२ क्रमांकाची लेण्या पाहिल्या. त्यांच्यासोबत अतिविशेष किंवा इतर अशी कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. त्यांच्यासमवेत काही सुरक्षारक्षक मात्र होते. ते वेरूळ येथे येत असल्याबाबतचा कुठला प्रोटोकॉलही नव्हता. इतर पर्यटकांप्रमाणेच त्यांनी लेण्या पाहिल्या. ते आणि त्यांचे कुटुंबिय बराच वेळ फोटो काढण्यातच दंग होते. त्यांना लेण्यांबाबत माहिती देण्यासाठी अलीम कादरी हे गाईड होते. जेफ बेजोस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मॅकेंझी टटल तीन मुले व एक मुलगी असा परिवार होता. त्यांचा सहायक असलेला तरुणही सतत त्यांच्या मागे-पुढे आणि समवेत चालताना दिसला. काही वेळा लेणी पाहण्यासाठी आलेले इतर पर्यटक त्यांच्या अगदी जवळूनही गेले. सुरक्षा रक्षकांमुळे ते ‘व्हीआयपी’ पाहुणे असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येत होते. मात्र त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणेच वावरण्यामुळे त्यांनी इतरांना प्रभावित केले. यावेळी त्यांनी काही पर्यटकांशी संवादही साधला. दुपारी दोन वाजता लेण्यांमध्ये पोहोचलेल्या बेजोस आणि त्यांच्या फॅमिलीने ४.३० वाजता लेणी सोडली.
२० वर्षांपूर्वीही आले होते
जेफ बेजोस यांच्याबाबतीत आणखी एक माहिती मिळाली की, सुमारे २० वर्षांपूर्वी ते वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ते एकटेच आले होते आणि अर्थातच त्यांची अॅमेझॉन कंपनीही नव्हती. वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या वेरूळच्या आठवणी त्यांनी शनिवारच्या भेटीत पुन्हा जागविल्या.
लेणींचा केला अभ्यास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेफ बेजोस यांनी लेणींना भेट देण्यापूर्वी या लेण्यांचा अभ्यास केला. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले आणि नंतर त्यांनी लेणींना भेट दिली. ते मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी लेणी पाहताना अधिक भाष्य केले नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावर त्यांनी भर दिला.
दोन दिवसांपूर्वी रेकी
जेफ बेजोस यांच्या वतीने त्यांच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळ, वेरूळ लेणी परिसराची रेकी केली होती. आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्या हॉस्पिटलची गरज पडलीच, तर त्यासाठीही शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (घाटी)सह दोन खाजगी हॉस्पिटल्सची सुरक्षा यंत्रणेने पाहणी केली होती.
जेफ बेजोस यांचे पाच तास..
शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी जेफ बेजोस औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर त्यांच्या खाजगी आणि आलिशान विमानाने आले.
१.०५ वा. - वेरुळला जाण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दोन आलिशान वाहनांमध्ये बसले.
२.०५- वेरुळ लेणी येथे पोहोचले.
४.३० - वेरुळ लेणीहून औरंगाबाद विमानतळाकडे निघाले.
५. ४० वा. - औरंगाबाद विमानतळावर आगमन.
६.०० वा. - खाजगी विमानाने वाराणसीकडे रवाना.