बेपत्ता नातवाला पाहून आजीच्या डोळ्यात अश्रू!
By Admin | Published: March 11, 2017 12:07 AM2017-03-11T00:07:43+5:302017-03-11T00:09:33+5:30
बीड : देवदेवतांची छायाचित्रे विकून मजल- दरमजल करत भटकणाऱ्या आजी व नातवाची गुरुवारी गेवराईत ताटातूट झाली.
बीड : देवदेवतांची छायाचित्रे विकून मजल- दरमजल करत भटकणाऱ्या आजी व नातवाची गुरुवारी गेवराईत ताटातूट झाली. आजीने अन्न- पाणी सोडले. पोलीस ठाणे गाठून नातू हरवल्याची तक्रार दिली. इकडे तळेगाव (ता. बीड) येथे वणवण भटकणारा एक बालक आढळला. त्याला नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हा मुलगा गेवराईतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. अखेर नातवाला आजीच्या स्वाधीन केले. तेव्हा आजीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
शिवकुमार तेली असे त्या नातवाचे तर चिनम्मा तेली असे आजीचे नाव. ते दोघे कर्नाटकातील कलीबर्गी जिल्ह्यातील जारंगी तालुक्यातील कट्टीसंगमचे रहिवासी. शिवकुमारचे आई- वडील ऊसतोडीचे काम करतात तर आजी- नातू छायाचित्रे विकून उदरनिर्वाह भागवतात. मजल - दरमजल करत ते बीड जिल्ह्यात आले. गेवराईत गुरुवारी ते पाल ठोकून मुक्कामी होते. मात्र, सायंकाळी शिवकुमार गायब झाला. आजीने सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. शेवटी तिने गेवराई ठाणे गाठून नातू हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी हा मेसेज वायरलेसवरुन सर्व ठाण्यांना कळविला. रिक्षातून शिवकुमार बीडला आला. त्याला कुठे जावे कळत नव्हते. भटकत तो तळेगावात पोहोचला. शुक्रवारी तळेगाव परिसरात एक ९ वर्षीय बालक वणवण फिरत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याला मराठी, हिंदीही येत नव्हती. त्याची भाषा समजणे कठीण बनल्याने गावकऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना कळविले. पोकॉ यू. टी. जरे, बबन सानप यांनी त्यास ताब्यात घेऊन बीडला आणले. यावेळी चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्त्वशिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडेही उपस्थित होते. गेवराईतून एक मुलगा गायब असल्याचे कळाल्यावर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क केला. वर्णनावरुन तो शिवकुमारच असावा असा अंदाज पोलिसांना होता. गेवराईचे पोलीस आजीला घेऊन बीडला आले. ग्रामीण ठाण्यात आजी- नातवाची २४ तासानंतर भेट झाली.