वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेना
By Admin | Published: June 13, 2014 11:39 PM2014-06-13T23:39:13+5:302014-06-14T01:19:29+5:30
पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे.
पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे.
तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रबी पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागले असून शासनाच्या मदतीवरच शेतकऱ्यांची मदार होती. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाच्या याद्या तयार करून बँकेकडे पाठविण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. परंतु या याद्यात बरीचशी तफावत झालेली आहे. गारपीट होऊनही अनेक शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीतून गायब झालेली आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पुरवणी याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडे खेटे मारणे सुरूच ठेवले आहे. चौकशी करून पुरवणी यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन संबधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
तालुक्यातील तांदूळवाडी, पोखर्णी देवी, सिरसम, महादेववाडी, चोरवड, भालकुडकी, लांडकवाडी, सादगीरवाडी, यमगीरवाडी, डोंगरगाव, हाकेवाडी, उक्कडगाव यासह अनेक गावातील शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे प्रशासनाने पुरवणी यादी तयार करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शांतीस्वरुप सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य नामदेव कदम, किशोर कदम, सचिन पवार, विठ्ठल कदम, आण्णासाहेब कदम, पंडित जाधव, रमेश मांजरे, दिगंबर जाधव, शरद जाधव, रामेश्वर जाधव, माणिक शिंदे, अरूण पाटील , गजानन शंकरे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
पेरणीसाठी अनुदान मिळण्याची गरज
पालम तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांना हवालदील करून सोडलेले आहे. तब्बल पंधरा दिवस गारपिटीने थैमान घातले होते. यामुळे पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब झाला. कापूस, गहू, हरभरा, करडई, कांदा, ज्वारी व बागायती पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. परंंतु शासनाच्या अनुदानावर शेतकऱ्यांची गणिते अवलंबून आहेत. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्यांंनी पेरणीच्या तोंडावर बियाणे व रासायनिक खतांची खरेदी केली. परंतु वंचित शेतकऱ्यांची पेरणीच्या तोंडावर परवड सुरु झाली आहे. रिकामा खिसा झाल्याने अनुदानावरच पेरणी अवलंबून आहे. यामुळे चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटप केल्यास खरीप पेरणी होईल़