खाजगी बसमधून गावठी कट्टा जप्त; पार्सलचे १०० रुपये चालक-वाहकाला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 02:21 PM2019-05-07T14:21:43+5:302019-05-07T14:22:44+5:30
अनोळखी व्यक्तीकडून पार्सल घेणे चालक-वाहकाला पडले महागात
खुलताबाद (औरंगाबाद ) : चाळीसगाव ते पुणे जाणाऱ्या एका खाजगी बसमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले. सोमवारी (दि.६ ) रात्री १२ वाजेच्या सुमारास खुलताबादेत बसच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चालक- वाहकाला अटक करण्यात आली असून पार्सल देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास चाळीसगाव ते पुणे ( व्हाया औरंगाबाद) जाणाऱ्या सरस्वती ट्रँव्हल्स कंपनीच्या बसमध्ये ( क्रमांक एम.एच.20 ई.जी. 1276 ) बेकायदेशीररित्या गावठी कट्टा ( पिस्टल) आणि जिवंत काडतुसचे पार्सल असल्याची माहिती मिळाली. यावरून खुलताबाद येथे वेरूळ टी पॉईंटला सापळा रचून पथकाने बसला अडवले. यानंतर तपासणीत चालकासमोर एका पिशवीतील खोक्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस आढळून आली. यावेळी चालकाने चाळीसगाव येथे एका अनोळखी व्यक्तीने यात देवीची मूर्ती असून ती पुण्यात देयची असल्याची सांगितले. पार्सलवर पुण्यातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिहून यासाठी त्याने १०० रुपये दिल्याची माहिती त्याने दिली.
यानंतर पोलिसांनी चालक शेख बद्रोद्दीन शेख अलीमोद्दीन ( 40, रा. नवागाव, चाळीसगाव) व वाहक समाधान दगडू मोरे (23 रा.देवळी ता.चाळीसगाव ) यांना ताब्यात घेतले. तसेच चालक-वाहक आणि पार्सल देणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ गणेश मुळे, दिपेश नागझरे, नदीम शेख, बाबा नवले यांच्या पथकाने केली.