पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचे टायर गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:35 PM2019-08-03T16:35:40+5:302019-08-03T16:37:54+5:30
पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
औरंगाबाद : घात-अपघातात पोलिसांनी जप्त केलेले वाहन जसेच्या तसे परत मिळेल याची आता खात्री देता येत नाही. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेल्या वाहनांचे सुटे भाग आणि चक्क टायर्स गायब झाल्याचे समोर आले आहे. हे सुटे भाग आणि टायर चोरट्यांनी पळविले अथवा अन्य कोणी याबाबत मात्र गौडंबगाल आहे. ठाणेप्रमुखांनी मात्र वाहनांचे सुटे भाग आणि टायर हे क्रेनचालकांकडे असल्याचा अजब दावा केला आहे.
रस्ता अपघातासह अन्य विविध गुन्ह्यांत वापरलेले वाहन पोलीस जप्त करतात आणि ठाण्याच्या आवारात उभी करतात. ठाण्यातील मुद्देमाल नोंदवहीमध्ये या वाहनाची नोंद केली जाते. न्यायालयाच्या आदेशाने ते वाहन संबंधित वाहनमालकाला परत केले जाते. मात्र, बऱ्याचदा वाहन परत मिळण्याचा न्यायालयाकडून आदेश प्राप्त होईपर्यंत ते वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातच उभे असते. अशा प्रकारे शेकडो वाहने एमआयडीसी सिडको ठाण्याच्या आवारात उभी आहेत.
जप्त वाहनांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ठाणेप्रमुखांची असते. असे असताना या ठाण्यातील अनेक वाहनांचे टायर्स गायब असल्याचे निदर्शनास आले. काळी-पिवळी जीप क्रमांक एमएच-२० डीएफ-००३० चे समोरील दोन्ही टायर काढून ही जीप दगडावर उभी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच जणांना चिरडून त्यांचे प्राण घेणाऱ्या स्कार्पिओ जीपचे मागील दोन्ही टायर गायब आहेत. याशिवाय अन्य एका ट्रकची केवळ बॉडी तेथे उभी आहे. या बॉडीखालील चारही टायर काढलेले आहेत. शिवाय या वाहनांचे हे तर डोळ्याने दिसणारे भाग आहेत. पोलिसांनी जप्त केलेली वाहनेच पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित न राहण्यामागचे काहीतरी गौडबंगाल आहे. या वाहनांच्या सुरक्षेकडे ठाणेप्रमुखांचे लक्ष्य नसल्याचे यावरून दिसून येते.
पोलीस निरीक्षकाचा अजब दावा
याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, अपघातातील वाहन रस्त्यावरून ठाण्यात आणताना बऱ्याचदा टायर निखळून पडलेले असते, तर रस्त्यावरील वाहन उचलून आणण्याचे शुल्क क्रेनचालकास कोणी द्यावे, हा प्रश्न असतो. तेव्हा क्रेनचालक शुल्काच्या बदल्यात त्या वाहनांचे टायर काढून घेतो. जेव्हा तो वाहनमालक वाहन नेण्यासाठी न्यायालयाचे आदेश घेऊन येतो, तेव्हा त्याच्याकडून क्रेनचालक शुल्क घेऊन त्याच्या वाहनाचे टायर त्यास परत करतो, ही जुनी प्रथा आहे, असा अजब दावा त्यांनी केला.