शंभर ग्रामपंचायतींची आयएसओसाठी निवड
By Admin | Published: September 7, 2014 12:10 AM2014-09-07T00:10:36+5:302014-09-07T00:30:30+5:30
परभणी : जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींची आयएसओेसाठी निवड करण्यात आली
परभणी : जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींची आयएसओेसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़ व्ही़ करडखेडकर यांनी दिली़
ग्रा़ पं़ कामकाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जात आहे़ हळूहळू ग्रामपंचायतींच्या कामकाजामध्येही बदल होत आहे़ त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींना आयएसओ मिळावा, यासाठीचे प्रयत्न जिल्हा परिषदेने चालविले आहेत़
यासंदर्भात माहिती देताना जि़प़च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमधील शंभर ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात आली आहे़
आयएसओ मिळविण्यासाठी या ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपण, ग्रामपंचायत इमारत, कर वसुली, स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, प्रिया, संग्राम सॉफ्टवेअरमधील माहितीची नोंद, ड्रेस कोड, बायोमेट्रीक प्रणालीवर उपस्थिती, हिरकणी योजनेची अंमलबजावणी, सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप, सामाजिक एकता दर्शविणारे कार्यक्रम, जन्म-मृत्यू नोंदणी, नियमित ग्रामसभा आदी एकूण ५३ मुद्यांची पूर्तता संबंधित ग्रामपंचायतींना करावी लागणार आहे़ यासाठी संबंधित ग्रामसेवकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, आता गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येणार असल्याचे करडखेडकर म्हणाले़ (जिल्हा प्रतिनिधी)