‘पीईएस’च्या सदस्यपदी निवृत्त आयएएस शेगावकर, मोपलवार, भापकरसह सहाजणांची निवड
By विजय सरवदे | Published: August 14, 2023 06:46 PM2023-08-14T18:46:10+5:302023-08-14T18:47:50+5:30
अध्यक्ष गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष सभा
छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी सेवानिवृत्त आयएएस विश्वनाथ शेगावकर यांच्यासह सी. आर. सांगलीकर, बी. शिलाराणी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक व सध्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, माजी आमदार श्रीकांत जोशी या सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर शहरातील मिलिंद महाविद्यालयात १० ऑगस्ट रोजी झालेल्या संस्थेच्या केंद्रीय विशेष सभेत या सदस्यांची निवड अंतिम करण्यात आली. यापूर्वी २७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सदस्यपदी वरील सदस्यांच्या नावांची चर्चा झाली व १० ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
आयुष्यमान विश्वनाथ अंबुजी शेगावकर हे मूळचे गोरेगाव बुद्रुक, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून ते विदर्भातील ख्यातनाम बौद्ध अभ्यासक व विचारवंत आचार्य दिनबंधू शेगावकर यांचे बंधू आहेत. ते १९८३ च्या बॅचचे ‘आयएएस’ असून तामिळनाडू केडर मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी व पुढे बढती मिळवत ते तामिळनाडू सचिवालयात प्रधान सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले. बी. शिलाराणी हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत.