जिल्ह्यातील सतरा शाळांची आदर्श मॉडेलसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:17+5:302021-09-19T04:04:17+5:30
बाजारसावंगी : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागास आदर्श शाळा निवडीसाठी झुकते माप दिल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आनंद ...
बाजारसावंगी : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागास आदर्श शाळा निवडीसाठी झुकते माप दिल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ४८८ शाळांची आदर्श मॉडेलसाठी निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात औरंगाबाद जिल्ह्यात १७ शाळांची निवड करण्यात आलेली आहे. तर खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत सदरील शाळेतील सुविधात परिपूर्ण वाढ होणार आहे. दर्जेदार इमारत, सुव्यवस्थित वर्गखोल्या, क्रीडा साहित्य, क्रीडांगण, आयसीटी लॅब, ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये, पूरक वाचनाची पुस्तके, संदर्भ ग्रंथ उपलब्ध केले जाणार आहेत. इयत्ता १ली ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या ४८८ आदर्श शाळेसाठी शासनाने ४९४ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. शाळा बांधकामासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. निधीच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून या आदर्श शाळेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.
------
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले
या आदर्श शाळेमुळे ( मॉडेल स्कूल) मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची द्वारे उघडी होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यास शाळेच्या या मॉडेलचा मोठा फायदा होणार आहे. असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड व माजी जि.प. सदस्या शोभा नलावडे यांनी व्यक्त केला.
------
जिल्ह्यातील आदर्श शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चपदावर जातील. आदर्श विद्यार्थी घडण्याची ही नांदी ठरणार आहे. - सचिन सोळुंके, गटशिक्षणाधिकारी
-----------
औरंगाबाद जिल्ह्यातील सतरा शाळा
१) जि.प. प्राथमिक शाळा : गाडीवाट
२) शासकीय विद्यानिकेतन
३) जि.प. प्राथमिक शाळा डोमेगाव
४)जि.प. प्राथमिक शाळा जैतापूर
५) जि. प. प्रा. प्रशाला बाजारसावंगी.
६) जि.प. शाळा वरवंडी तांडा
७) जि.प. शाळा ढोरकीन
८) जि.प. शाळा जळगाव मेटे
९) जि.प. शाळा केऱ्हाळा
१०) जि.प. शाळा सोयगाव
११) जि.प. शाळा सोयगाव
१२) जि.प. शाळा बोरसर
१३) जि.प. मुलींची प्रा. शाळा लासूरगाव
१४) जि.प. शाळा सुदामवाडी
१६) जि.प. शाळा पोखरी
१७) मनपा शाळा नारेगाव