बचत गटाने दिली आत्मनिर्भर होण्याची संधी ! तेजोमय वस्तीस्तर संघाने घेतली अल्पवधीत भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:11 PM2022-03-08T19:11:28+5:302022-03-08T19:13:21+5:30
बचत गट म्हणजे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे एवढ्यापुरतीच त्यांच्या कार्याची व्याप्ती राहिलेली नाही, बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नही हाताळण्यात येत आहेत.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत बचत गटांच्या चळवळीला सुरुवात करण्यात आली. महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आता यश शिखरही गाठत आहे. बचत गटामुळे आत्मसन्मान मिळत आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली. औरंगाबाद शहरातील तेजोमय वस्तीस्तर संघानेही आता भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.
भारतात १९९२मध्ये बचत गटाच्या चळवळीला खरी सुरुवात झाली. मागील काही वर्षांमध्ये महिलांना बचत गटाचे महत्त्वच कळाले नाही. ज्या महिलांनी बचत गट स्थापन करून कामाला सुरुवात केली, त्यांना आज यश मिळत आहे. बचत गट म्हणजे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे एवढ्यापुरतीच त्यांच्या कार्याची व्याप्ती राहिलेली नाही, बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नही हाताळण्यात येत आहेत.
जुना मोंढा भागातील महिलांनी एकत्र येत १६ बचत गट स्थापन केले. तेजोमय वस्तीसंघांतर्गत हे सर्व बचत गट चालविण्यात येतात. या बचत गटांची वर्षाला ३ लाखांहून अधिक आर्थिक उलाढाल होते. कोरोनाच्या तीन लाटांमध्ये बचत गटांचे कार्य पूर्णपणे ठप्प पडले होते. आता लाट संपल्यावर बचत गटाचे काम हळूहळू पुढे सरकत आहे. एका बचत गटात किमान ११ आणि जास्तीत जास्त १५ महिलांचा समावेश करण्यात आला आहे. बचत गटाच्या महिला कुरडई, खाकरा, बाकरवडी, शेंगदाणा लाडू, चिवडा इत्यादी अनेक चविष्ट खाद्यपदार्थ तयार करून विक्री करतात. त्यातून बचत गटाच्या कामकाजाला अधिक गती मिळते. या कामात महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मोठे सहकार्य असते. बचत गटांच्या तयार साहित्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम मनपाकडून करण्यात येते.
सामाजिक बांधिलकीही जपतो
मागील काही वर्षांमध्ये आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबिर, कॅरिबॅग जनजागृती, स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबविले आहेत. यापुढेही अनेक कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- रेखा बल्लाळ, अध्यक्ष, तेजोमय वस्तीस्तर संघ