पैठण येथे गोदापात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:24 PM2018-07-29T23:24:25+5:302018-07-29T23:24:31+5:30
कडेकोट बंदोबस्त : ५० तरुणांचे जीवरक्षक दल व चार बोटी तैनात
पैठण : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत व मेगा भरती रद्द करण्यात यावी,
या मागणीसाठी रविवारी पैठण येथे सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने गोदावरी नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कायगाव टोका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मोठा पोलीस बंदोबस्त गोदाकाठावर तैनात केला होता.
पोलीस, महसूलचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे जवान, तटरक्षक जवान, बोट, रूग्णवाहिका आदी यंत्रणा गोदावरीच्या घाटावर सज्ज होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गोदापात्राकडे रवाना झाले.
गोदावरीच्या मोक्षघाटावर किशोर शिरवत, किशोर सदावर्ते, सतीश आहेर, संजय मोरे, पवन शिसोदे, अनिल राऊत, ज्ञानेश्वर जाधव, किशोर दसपुते, अरुण काळे, उध्दव कळसकर, कृष्णा तावरे, किशोर तांगडे, परमेश्वर क्षीरसागर, संभाजी काटे, संतोष गोबरे आदींनी गोदावरी नदीच्या पात्रात उतरून एक तास अर्धनग्न व अर्ध जलसमाधी आंदोलन केले.
तहसीलदारांचे आश्वासन
तहसीलदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहच करू, असे आश्वासन दिले. कायगाव टोका येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी चोख पोलीस बंदोबस्त नाथ घाट परिसरात तैनात केला होता. याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, मुकुंद आघाव हेही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. राज्य राखीव पोलीस दल, दंगा काबू पथक, औरंगाबाद ग्रामीण मुख्यालयाचे पोलीस यांनाही पाचारण करण्यात आले होते.
प्रशासनाकडून सुरक्षा व खबरदारी
प्रशासनाने सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून ५० तरुणांचे जीवरक्षक दल व चार बोटी यावेळी गोदावरी पात्रात तैनात केल्या होत्या. तहसीलदार महेश सावंत, उपमुख्याधिकारी दिलीप साळवे, मंडळ अधिकारी श्रीमती बागूल, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक चंदन इमले, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सहायक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार विलास घुंसिगे आदींसह पोलीस व महसूलचे अधिकारी आंदोलनावर लक्ष ठेऊन होते. आंदोलन बघण्यासाठी नागरिकांनी घाटावर मोठी गर्दी केली होती. माजी आमदार संजय वाघचौरे यांंनीही यावेळी आंदोलकासमवेत जोरदार घोषणाबाजी केली.