भाजपासह सेनेच्या बंडखोरालाही सभापतीपदाची लागली ‘लॉटरी’

By Admin | Published: March 24, 2017 11:54 PM2017-03-24T23:54:51+5:302017-03-24T23:57:07+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची वर्णी लागल्यानंतर शुक्रवारी विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

Sena rebels, along with BJP, were elected to the post of 'Lottery' | भाजपासह सेनेच्या बंडखोरालाही सभापतीपदाची लागली ‘लॉटरी’

भाजपासह सेनेच्या बंडखोरालाही सभापतीपदाची लागली ‘लॉटरी’

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची वर्णी लागल्यानंतर शुक्रवारी विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चारही पदासाठी दुरंगी सामना झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या सहकार्याने चार सदस्य संख्या असलेल्या भाजपला दोन आणि शिवसेनेतील बंडखोर उमेदवारासही सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी ऐनवेळी बंडाचे निशाण फडकाविले. मात्र भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. चालुक्य यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सेना आणि काँग्रेसची मिळून त्यांना चोवीस मते मिळाली.
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला. परंतु, बहुमतासाठी त्यांना दोन सदस्यांची गरज होती. तर दुसरीकडे सेना आणि काँग्रेसच्या जागा घटल्या. या दोघांना मिळून बहुमतासाठी चार जागांची आवश्यकता होती. त्यामुळे राष्ट्रवादीसह सेना-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. परंतु, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला सोबत घेतले. याबरोबरच सेनेचे दोन सदस्य फोडून त्यांना गैरहजर ठेवले. त्यामुळे अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विराजमान झाले. भाजपाचा मिळविलेला पाठिंबा आणि शिवसेनेचे गैरहजर राहिलेले दोन सदस्य यामुळे सभापती निवडीवेळी काय राजकीय गणिते तयार होतात. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
सभापतीपदासाठीही इच्छुकांची संख्या मोठी होती. दगाफटका होवू नये, म्हणून राष्ट्रवादीकडून सर्व सदस्यांना सहलीवर पाठविले होते.दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली असता, दुपारी १ वाजेपर्यंत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. दुपारी दोन वाजता विशेष सभेला सुरूवात झाली. दुपारी २ ते २.१५ या वेळेत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता सर्व अर्ज वैध ठरले. दुपारी २.३० पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अंजली शेरखाने, जयश्री खंडागळे (महिला व बालकल्याण), धनराज हिरमुखे (अर्थ व बांधकाम) आणि महेंद्र धुरगुडे (कृषी समिती) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे चारही सभापतीपदासाठी दुरंगी लढत झाली.
समाज कल्याण सभापतीपदासाठी चंद्रकला नारायणकर आणि उद्धव साळवी यांच्यात लढत झाली. नारायणकर यांना ३१ तर साळवी यांना २३ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नारायणकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले. महिला व बालकल्याण समितीसाठी सखूबाई पवार आणि अंजली शेरखाने यांच्यात लढत झाली. यावेळी बंडखोरी केलेले महेंद्र धुरगुडे तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादी-भाजपाच्या उमेदवार सखूबाई पवार यांना ३१ ऐवजी ३० तर सेनेच्या उमेदवार शेरखाने यांना २३ मते मिळाली. बांधकाम सभापतीसाठीही दोनच उमेदवार रिंगणात होते. सेना-काँग्रेसने धनराज हिरमुखे यांची उमेदवारी मागे घेत महेंद्र धुरगुडे यांच्या बाजूने ताकद उभी केली.
धुरगुडे यांना २४ तर राष्ट्रवादी-भाजपाचे अभय चालुक्य यांना ३० मते मिळाली. त्यामुळे चालुक्य यांची सभापतीपदी वर्णी लागली. दरम्यान, कृषी सभापती पदासाठीही दोनच उमेदवार रिंगणात उरले होते. काँग्रेसचे प्रकाश चव्हाण आणि अबिदाबाई जगताप यांच्या थेट लढत झाली. याही ठिकाणी धुरगुडे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपाच्या उमेदवार जगताप यांना ३१ ऐवजी ३० मते पडली. तर चव्हाण यांना २३ मते मिळाली. त्यामुळे जगताप यांची सभापतीपदी निवड झाल्याचे पाठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. दरम्यान, निवडी जाहीर होताच राष्ट्रवादीसह भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतषबाजीही केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पीठासीन अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Sena rebels, along with BJP, were elected to the post of 'Lottery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.