'सिनेट सदस्याचा कामकाजात हस्तक्षेप'; विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांची थेट कुलपतींकडे तक्रार
By राम शिनगारे | Updated: January 29, 2025 19:34 IST2025-01-29T19:33:02+5:302025-01-29T19:34:56+5:30
राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्याने परीक्षेचे कामकाज प्रभावित करण्याच्या प्रयत्नातून कर्मचाऱ्यातील नामनिर्देशीत सिनेट सदस्याची परीक्षा विभागात बदली करून घेतली आहे; परीक्षा संचालकांनी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार

'सिनेट सदस्याचा कामकाजात हस्तक्षेप'; विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांची थेट कुलपतींकडे तक्रार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोपनीय कामकाज नियंत्रित करण्यासाठी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्याने कर्मचाऱ्यातील नामनिर्देशीत सिनेट सदस्याची परीक्षा विभागात बदली करून घेतली आहे. त्या सदस्याच्या माध्यमातून परीक्षेचे कामकाज प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गंभीर तक्रार परीक्षा संचालकांनी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी कुलपतींना पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, २३ जानेवारीला कुलगुरूंच्या दालनामध्ये १:३० वाजता एक घटना घडली. त्यावेळी कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्या उपस्थितीत राज्यपाल नियुक्ती व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी आरडाओरड करीत धमक्या दिल्या. डॉ. सानप यांचे वागणे अयोग्य, व्यत्यय आणणारे आणि कामासाठी प्रतिकुल वातावरण निर्माण करणार होते. त्यावेळी त्यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून नामनिर्देशीत सिनेट सदस्य डॉ. एस.बी. चव्हाण हे माझे व्यक्ती आहेत. त्यांची परीक्षेच्या संबंधित कामे हाताळण्यासाठीच परीक्षा विभागात बदली केली असल्याचे सांगितले. हा प्रकार परीक्षेच्या संदर्भातील अत्यंत संवेदनशील, गोपनीयताचा भंग करणार आहे तसेच परीक्षा विभागाची विश्वासार्हता धोक्यात आणणार असल्याचेही म्हटले आहे.
त्याशिवाय सिनेट सदस्य डॉ. चव्हाण यांचा परीक्षा विभागात गैरवर्तनाचा इतिहास आहे. ते डॉ. सानप यांच्याशी संबंध असल्याचे सांगून सातत्याने गैरवर्तन करतात, आदेशांचे उल्लेघन करून इतरांना धमकावतात. ही बाब चिंतेची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही परीक्षा संचालकांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांचेही कुलपतींना निवेदन
विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेनेही कुलपतींना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्यासोबत डॉ. सानप यांनी केलेल्या अरेरावीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्यासह ८८ कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
हस्तक्षेप न करण्याच्या सूचना
कुलपती तथा राज्यपालांनी डॉ. सानप यांना ७ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ. वाघ यांच्यासोबत केलेल्या वर्तनाबाबत पत्र पाठवले होते. त्यात विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करू नका, असे स्पष्ट आदेशच दिले होते.
परीक्षा संचालकांचे आरोप चुकीचे
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या दालनात कर्मचाऱ्याच्या बदल्याबाबत चर्चा सुरू होती तेव्हा कुलगुरूंना सांगितले की, सिनेट सदस्य झाल्यापासून डॉ. चव्हाण यांना टार्गेट केले जात आहे. त्याविषयी कुलगुरूंनी खातरजमा करावी असे सांगितले. परीक्षा संचालकांसोबत काहीही बोलणे झालेले नाही. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत.
- डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य