पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा

By साहेबराव हिवराळे | Published: November 3, 2023 03:57 PM2023-11-03T15:57:18+5:302023-11-03T15:59:03+5:30

पोस्टाच्या दिवाळी कुरिअर सेवेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Send Diwali snacks without hassles by post; Easy service of rights at home and abroad | पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा

पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनिमित्त परदेशात असलेल्या नातेवाइकांना खाद्यपदार्थ पोहोचवून प्रेमभावाचा धागा दृढ करण्याची भूमिका टपाल कार्यालय दरवर्षी बजावते. यंदा त्यांच्या सेवेत अधिक पारदर्शकता निर्माण झाल्याने पार्सल पाठविण्याकडे शहर, खेड्यातील नागरिकांचा कल वाढलेला दिसत आहे.

परदेशात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींची दिवाळी गोड करण्यासाठी शंभरांपेक्षा अधिक देशांत फराळ आणि भेटवस्तू पाठविण्याची टपाल विभागाने सुविधा उपलब्ध केली आहे. शहरातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंच्या पॅकेजिंगची सोयही यंदा करण्यात आली असून, वजनानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे.

दिवाळी कुरिअर सेवेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी स्पर्धक कितीही वाढले, तरी टपाल खात्यावरील विश्वासार्हतेमुळे नागरिकांचा स्पीड पोस्टसह आंतरराष्ट्रीय सेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. आंतरराष्ट्रीय टपाल आणि कुरिअर सेवेतून भरघोस उत्पन्न टपाल खात्यास मिळत आहे.

पार्सल सेवेत वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात नोकरीनिमित्त, तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेतही लक्षणीय वाढ होत आहे. प्रामुख्याने दिवाळीत प्रत्येकाला भारतात येणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, भेटवस्तूंसह इतर सामान परदेशात पाठवले जात आहे.

पॅकिंगबाबत जनजागृती
नागरिकांनी पिशव्यांमध्ये आणलेले साहित्य आंतरराष्ट्रीय निकषांनुसार बॉक्समध्ये पॅक करून देण्यासह कागदपत्रांच्या पूर्ततेबाबतही टपाल कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे प्रवर डाक अधीक्षक अशोक धनवडे यांनी दिली.

Web Title: Send Diwali snacks without hassles by post; Easy service of rights at home and abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.