बँकेला ई-मेल पाठवून १० लाखांचा गंडा घातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:25 AM2018-07-08T01:25:49+5:302018-07-08T01:26:07+5:30
बँकेला ई-मेल पाठवून दिल्लीच्या बँक खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे टाकण्याचे सांगून बँकेची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जुलै रोजी समर्थनगरातील आयडीबीआय बँकेत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बँकेला ई-मेल पाठवून दिल्लीच्या बँक खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे टाकण्याचे सांगून बँकेची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जुलै रोजी समर्थनगरातील आयडीबीआय बँकेत घडली.
या शाखेचे सहायक व्यवस्थापक सुशील श्रीकृष्ण पांडे यांच्या बँकेला ५ जुलै रोजी सकाळी १०.०६ वाजता देवगिरी बँक व्यवस्थापकाच्या मेलवरून ई- मेल प्राप्त झाला. या ई- मेलमध्ये दिल्लीच्या गौरी इंटरप्रायजेसच्या खात्यात दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार बँकेने लगेच दहा लाख रुपये त्या खात्यात जमा केले. ही रक्कम टाकल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी देवगिरी बँकेच्या व्यवस्थापकाला फोन करून तुमच्या मेलनुसार आम्ही संबंधित खात्यात दहा लाख रुपये टाकल्याचे सांगितले. देवगिरी बँकेच्या व्यवस्थापकाने आम्ही अशा प्रकारचा ई- मेल पाठविला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच दिल्ली येथील संबंधित बँकेशी संपर्क साधून बँकेने वर्ग केलेले दहा लाख रुपयांचे पेमेंट करू नये, असे कळविले. मात्र तोपर्यंत गुन्हेगारांनी ३ लाख ४० हजार रुपये काढून घेतले होते. उर्वरित रक्कम वाचली. पांडे यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड तपास करीत आहेत.