'वृक्षारोपणाचा सेल्फी पाठवा, गिफ्ट मिळवा'; मनसेचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:40 PM2021-05-13T17:40:18+5:302021-05-13T17:41:08+5:30
मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु असल्याने वृक्षतोड वाढली आहे.
खुलताबाद : नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'वृक्षलागवडीचा सेल्फी पाठवा, गिफ्ट मिळवा' अशी अनोखी योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खुलताबाद तालुका शाखेच्यावतीने राबविण्यात येत आहे. अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित हा उपक्रम संपूर्ण औरंगाबाद जिल्हासाठी असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष अविराज निकम पाटील यांनी सांगितले.
सध्या शहरी आणि ग्रामीणभागात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन करणे काळाची गरज ठरत आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनोख्या उपक्रमाबाबत माहिती देताना अविराज निकम म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिनेअभिनेते प्रकाश भागवत यांच्या संकल्पनेतून एक हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचा सेल्फी शेअर केल्यास आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे. हे गिफ्ट निवडक 100 सेल्फीसाठीच देण्यात येणार आहे. यामागे नागरिकांना जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश असल्याचे निकम यांनी सांगितले.