४३ ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:02 AM2021-09-23T04:02:06+5:302021-09-23T04:02:06+5:30
औरंगाबाद : ‘थोडेसे माय बापासाठी’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. वृद्धांना मिळणाऱ्या योजना, आरोग्यविषयक अडचणी, उपचाराची ...
औरंगाबाद : ‘थोडेसे माय बापासाठी’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. वृद्धांना मिळणाऱ्या योजना, आरोग्यविषयक अडचणी, उपचाराची सोय याबद्दल माहिती ग्रामपंचायती संकलित करीत आहेत. आतापर्यंत ३८ हजार २४१ वृद्धांची माहिती जमा झाली आहे. तर ४३ ग्रामपंचायतीमध्ये जेष्ठ नागरिक सुविधेसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाले आहेत.
‘थोडेसे माय बापासाठी’ उपक्रमासाठी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी जेष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन करणे, आरोग्य शिबिर उपकेंद्र स्तरावर आयोजित करणे, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणे, त्यांच्या पूजेचा कार्यक्रम घेणे. ज्येष्ठांना आवश्यक साहित्य काठी, बॅटरी, शाल, स्वेटर वाटप करण्यासाठी नियोजन करावे. तसेच जेष्ठ नागरिक कक्ष ग्रामपंचायतनिहाय स्थापन करावे अशा सूचना उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी दिल्या.
वृद्धांना आधार देण्यासाठी....
या योजने अंतर्गत विविध उपक्रमांची सुरुवात १ ऑक्टोबरपासून करायची आहे. आतापर्यंत ८६७ पैकी ४३ ज्येष्ठ नागरिक कक्ष विविध ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत सुरू झाले आहे, असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे म्हणाले. वृद्धांना आधार देणे त्यांना विविध योजनेचे लाभ देणे व दैनंदिन जीवनातील एकटेपण कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. वृद्ध कक्षात बसण्याची व्यवस्था, वाचण्यासाठी साहित्य, पाणी, आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून दिवसभर बसण्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्वेक्षणाची आकडेवारी
तालुका : ज्येष्ठ नागरिक
औरंगाबाद : ८,९५४
सोयगाव : ५,६४९
वैजापूर : ५,१५१
गंगापूर : ३,९३९
फुलंब्री : ३,७६९
सिल्लोड : ३,७३१
खुलताबाद : २,५६६
पैठण : २,२५१
कन्नड : २,२०१