बदलीसाठी २५ हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीक रंगेहात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 08:02 PM2020-02-25T20:02:42+5:302020-02-25T20:03:15+5:30
तक्रारदार यांनी बदली मिळावी, याकरीता कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद: बदली अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करुन देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून २५ हजार रुपये लाच घेताना मृद व जलसंधारण विभागाच्या(वाल्मी)वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. २५ फेब्रुवारी रोजी वाल्मी संस्थेत ही कारवाई करण्यात आली.
सतीश लक्ष्मणराव मुळे (वय ४९)असे अटके तील लाचखोर लिपीकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार हे मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आहेत. या विभागाचे वाल्मी हे मुख्यालय आहे. तर आरोपी हा वाल्मीमध्ये वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांनी बदली मिळावी, याकरीता कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज वरिष्ठांकडे तात्काळ सादर करावा, याकरीता तक्रारदार हे वरिष्ठ लिपीक मुळे यांना भेटले होते. तेव्हा मुळे यांनी बदली अर्ज वरिष्ठांकडे सादर करुन इच्छित ठिकाणी बदली करुन देतो, असे सांगितले. बदलीच्या कामासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. पैसे दिले तरच हवी तेथे बदली मिळेल असे स्पष्टपणे बजावले.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार , उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे कर्मचारी भिमराज जिवडे, संतोष जोशी, कपील गाडेकर यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा वरिष्ठ लिपीक मुळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मुळे यांनी सांगितल्यानुसार तक्रारदार हे लाचेची रक्कम घेऊन मंगळवारी दुपारी वाल्मी संस्थेत गेले. तत्पूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तेथे सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी सतीश मुळे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी मुळेविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गावडे यांनी सांगितले.