जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 06:54 PM2022-01-24T18:54:20+5:302022-01-24T18:57:18+5:30
१९६० मध्ये ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले होते.
औरंगाबाद : ज्येष्ठ फिजिशियन व नामांकित तज्ज्ञ डाॅ.रघुनाथ भास्कर भागवत उपाख्य डाॅ.आर.बी. भागवत (९२, रा. मित्रमंडळ हाउसिंग सोसायटी, नवा उस्मानपुरा) यांचे सोमवारी (दि.२४) सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी सुधा, ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डाॅ.अजित भागवत, उद्योजक किरण भागवत, कंपनी सेक्रेटरी सचिन भागवत, चार भाऊ, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुळचे इंदूर येथील भागवत कुटुंबीयातील सात भावंडात आर.बी. भागवत सर्वात मोठे होते. त्यांचे बालपण व शिक्षण पुण्यात झाले. १९४९ मध्ये त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश घेत, १९५३ मध्ये एमबीबीएस तर १९५६ मध्ये एमडी पूर्ण करून १९६० मध्ये ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले. १९८४ पर्यंत ते घाटी रुग्णालयात सेवा देत असताना, १९६३ ते १९८५ पर्यंत प्राध्यापक व औषधवैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख होते.१९७६-७७ ही दोन वर्षे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतरही ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.