बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही?; चंद्रकांत खैरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:55 PM2022-07-27T12:55:56+5:302022-07-27T13:04:02+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना सवाल विचारला आहे.
औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत आहे. मात्र माझ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना सांभाळा, असं आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. मग बंडखोर आमदार आणि खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त नावाचा वापर करायचा असून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणंदेणं नसल्याचं यावरुन दिसून येत आहे. जर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विचार समोर आला असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती, असंही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या गटांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ठाकरे कुटुंब विरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात वक्तव्य करू नाही, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली- शिवसेनेचे नेते संजय राऊत
बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आता शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच "ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. चुका सगळीकडेच होत असतात, कुटुंबातही होतात. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंब कमकुवत करण्याचा काहींचा मनसुबा आहे" असं म्हटलं आहे.