जायकवाडी जलाशयात दोन मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 07:43 PM2020-01-27T19:43:36+5:302020-01-27T19:45:23+5:30
मृतांची ओळख पटली असून एकजण जळगाव तर दुसरा शेवगावचा रहिवाशी आहे
पैठण : जायकवाडीच्या जलाशयात आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असलेले आढळून आले. एकाच वेळी दोन मृतदेह जलाशयात आढळून आल्याने पैठण शहरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर दोघांची ओळख पटली असून हेमंतकुमार प्रभु सोणार (४२) जळगाव व संदीप मधुकर देशमुख, शेवगाव अशी दोघांची नावे आहेत.
जायकवाडी धरणाच्या १४ क्रमांकाच्या दरवाजाजवळ व धरणाच्या व्ह्यू पॉंईट जवळ अशा दोन ठिकाणी जलाशयात आज दुपारी अज्ञात ईसमाचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. या बाबत धरण नियंत्रण कक्षातून पैठण पोलिसांना खबर देण्यात आली. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल भिमलाल राठोड, किशोर शिंदे गणेश कुलट आदींनी घटनास्थळी जाऊन व्ह्यू पॉंईट परिसरात जलाशयात असलेला मृतदेह स्थानिक तरूणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मृतदेहाच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी संबंधित व्यक्ती हेमंतकुमार प्रभू सोणार वय ४०, राहणार जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. हेमंतकुमार सोणार जळगाव येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धरणाच्या दरवाजाजवळ असलेला दुसरा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी बरेच अंतर पोहून मृतदेहास खेचून आणावे लागत असल्याने होडी शिवाय पर्याय नव्हता दरम्यान वनखात्याची धरणावर गस्तीसाठी असलेली बोट नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मच्छीमाराच्या चप्पूचा वापर करून संबंधित मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याच्या जवळील कागदपत्रावरून तो शेवगाव जी अहमदनगर येथील धनगरवाडा परिसरातील रहिवाशी संदीप मधुकर देशमुख (२६) असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह पैठण येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
हे दोघे पाण्यात बुडाले की त्यांनी आत्महत्या केली या बाबत काही समजले नाही. पुढील तपास पोलीस जमादार भिमलाल राठोड, किशोर शिंदे हे करत आहेत. दरम्यान दोघांच्या नातेवाईकांना पोलिसांनी या बाबत कल्पना दिली असून बातमी लिहेपर्यंत नातेवाईक पैठण येथे आले नव्हते.