वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून
By राम शिनगारे | Published: September 1, 2022 02:29 PM2022-09-01T14:29:10+5:302022-09-01T14:29:47+5:30
घरगुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद: घरघुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. महिला गंभीररित्या भाजली असून तिच्यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत.
सविता दीपक काळे ( 32, रा.मांडवा गाव, ता.गंगापूर) असे महिलेचे नाव आहे. नवऱ्यासोबत सारखे भांडण होत होते यातून सविता काळे तणावात होत्या. महिलेचा मूळ वाद शेजाऱ्यांसोबत आहे, यात पतीही शेजाऱ्यांची साथ देतो. मारहाण करतो अशी महिलेची तक्रार आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांना देखील पतीने मारहाण केली होती. त्या तणावातून सविता काळे आज दुपारी शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. कार्यालयात त्यांनी निवेदन सादर केले.
निवेदन देऊन खाली येताच आयुक्तालयाच्या पायरीजवळ अचानक त्यांनी टोकाचा निर्णय घेत सोबत आणलेला ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर टाकून पेटवून घेतले. पोलीस आयुक्त यांच्या गाडीसमोर त्यांच्याच कार्यालयामध्ये जाळून घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लागलीच महिलेस घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार महिला ८० टक्के भाजली आहे.