कोरोनासाठी घराघरात वेगळे बजेट; अनेक वस्तूंची झाली सामानात एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:08 PM2020-07-28T17:08:42+5:302020-07-28T17:19:17+5:30

प्रत्येकाच्या वागण्यात आणि दैनंदिन कामाच्या स्वरूपात कोरोनामुळे अनेक बदल झाले आहेत.

Separate in-house budget for Corona; Many items were entered in the luggage | कोरोनासाठी घराघरात वेगळे बजेट; अनेक वस्तूंची झाली सामानात एण्ट्री

कोरोनासाठी घराघरात वेगळे बजेट; अनेक वस्तूंची झाली सामानात एण्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्देस्वयंपाक घरातही विविध बदल, जीवनशैलीत उल्लेखनीय बदलमास्क, सॅनिटायझर, काढा आयुर्वेदिक औषधांची झाली खरेदी

औरंगाबाद : कोरोनामुळे अनेक वस्तूंनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता मास्क, सॅनिटायझर आणि तत्सम काही वस्तूंशिवाय जगणे कठीण झाले आहे. कोरोनापासून संरक्षण म्हणून अनेक घरांमध्ये विशेष साहित्यांची खरेदी झाली आहे. त्यामुळे आता महिन्याला एक ठराविक रक्कम कोरोनाविशेष सामानासाठी आवर्जून बाजूला काढून ठेवावी लागत असल्याचे काही गृहिणींनी सांगितले. 

प्रत्येकाच्या वागण्यात आणि दैनंदिन कामाच्या स्वरूपात कोरोनामुळे अनेक बदल झाले आहेत. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या खिशात, पर्समध्ये, गाडीत आता सॅनिटायझरच्या लहान-लहान बाटल्या मिरवू लागल्या आहेत. घरांमध्ये चपला ठेवण्याची जागाही बदलण्यात आली असून दारामध्येच चपला ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक घरांच्या बाहेर सॅनिटायझर घातलेल्या  पाण्याची बादली दररोज भरलेली असते. या पाण्याने पाय धुऊन मगच घरात यायचे, असे नियमच काही गृहिणींनी केले आहेत. बाहेरून आल्यावर न चुकता आंघोळ आणि घातलेले कपडे थेट धुवायला टाकणे, रात्री झोपताना वाफ घेणे हा तर अनेकांचा नित्यक्रम झाला आहे. अंगणात तर सॅनिटायझर असतेच; पण घराच्या हॉलमध्येही आता इतर शोभेच्या वस्तूंबरोबर सॅनिटायझर स्प्रेनेही मानाचे स्थान पटकाविले आहे. घरात प्रत्येक सदस्यासाठी किमान दोन मास्कची खरेदी झालेली आहे. यामुळे आता महिन्याला साबण, हॅण्डवॉश,  वॉशिंग  पावडर, फिनेल यांचाही खर्च वाढल्याचे महिलांनी सांगितले.

स्वयंपाक घरातही विविध बदल :
- हळद, लिंबू, अद्रक, तुळस आणि इतर साहित्यांनी तयार झालेला काढा घेऊनच  सध्या अनेकांचा दिवस  सुरू होत आहे. आधी हा काढा आणि नंतर चहा असा बदल करून घेतला आहे. 
- सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करणारे लवंग, ज्येष्ठ मध, सुंठ यासारखे पदार्थ आज अनेकांच्या स्वयंपाकघरात अग्रभागी आले आहेत.
- एरवी थोडासा लागणारा सोडा आता भाज्या धुण्यासाठी वापरण्यात येत असल्याने दर महिन्याला किराणा यादीत न चुकता सोडा आणि जास्तीचे मीठ या पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे.
- बाहेरून घरात आलेल्या व्यक्तीला गरम पाणी देणे आता अनेक गृहिणींच्या अंगवळणी पडले आहे. 
- दररोज भाजी घेण्यापेक्षा आता आठवड्याच्या भाज्यांची खरेदी एकदाच होत असल्याने भाज्या धुण्यासाठी  मोठा टब, बाहेरून आणलेल्या वस्तू काही काळ तशाच ठेवण्यासाठी जाळीचे ट्रे, सॅनिटायझर फवारणीसाठी स्प्रे यांची खरेदी होत आहे.

घरगुती वापरासाठीही सॅनिटायझरची कॅन
मार्च महिन्यात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा १०० मिलि, २०० मिलि सॅनिटायझरच्या बाटल्यांना मोठी  मागणी होती; परंतु आता थेट ५ लिटर ते १०० लिटरच्या कॅन घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. घरगुती वापरासाठीही लोक ५ ते १० लिटरच्या कॅन नेत आहेत. त्यामुळे लहान बाटल्यांची विक्री घटली असून, जास्त  प्रमाणातील सॅनिटायझरला मोठी मागणी आहे.
- विनोद लोहाडे, सचिव, औरंगाबाद केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन 

Web Title: Separate in-house budget for Corona; Many items were entered in the luggage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.