बायपासवरील मृत्यूचे सत्र सुरूच; आणखी एकाचा अपघातात बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:54 AM2021-02-25T11:54:00+5:302021-02-25T11:55:00+5:30
Accident on Beed Bypass बायपासवरील सुर्या लॉनसमोर अज्ञात मोटरसायकलस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.
औरंगाबाद: बायपासवर अपघाताची मालिका रोखण्यात प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. आज सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास भावाला भेटण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने उडविल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. राजाभाऊ बाबासाहेब साठे (५४, रा. माऊलीनगर, कारेगांव,परभणी) असे मयताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार राजाभाऊ हे भावाला भेटण्यासाठी औरंगाबादेत आले होते. आज सायंकाळी पावणेचार वाजेच्या सुमारास ते देवळाई चौकाकडून झाल्टा फाट्याकडे पायी जात होते. बायपासवरील सुर्या लॉनसमोर अज्ञात मोटरसायकलस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी राजाभाऊ यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बायपासवरील मृत्यूचे सत्र सुरूच
बीडबायपासवर अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी बायपासची पहाणी केली. यानंतर वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किमी ही करण्यात आली. याशिवाय भरीव असे कोणतेही काम बायपासवर झाले नाही. परिणामी बायपासवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. नवीन वर्षात बायपासवर सात जणांचे बळी गेले आहेत.