गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयातील ‘सर्व्हर डाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:05 AM2021-03-27T04:05:37+5:302021-03-27T04:05:37+5:30
सध्या लॉकडाऊनच्या भीतीने नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. या कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करतांना आधी ई-म्यूटेशन ...
सध्या लॉकडाऊनच्या भीतीने नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे.
या कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार करतांना आधी ई-म्यूटेशन प्रणालीद्वारे संबंधित व्यवहारांची ऑनलाइन डाटा एन्ट्री होते. त्यानंतर चलनाचा देखील ऑनलाइन भरणा करून मग दस्त नोंदणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. यातील तांत्रिक दोष सुधारणे अथवा विकसित करण्याचे काम देखील संबंधित विभागाकडून केले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून येथील एनआयसीचे सर्व्हर दिवस दिवसभर डाऊन राहत आहे. यामुळे दस्त नोंदणीचे व्यवहार लांबत आहेत. नागरिकांनी याविरोधात अनेकदा आवाज उठविला असतांना यात सुधारणा होण्याऐवजी सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. एनआयसीच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी दिवसेंदिवस ताटकळत बसावे लागत आहे.
कोट
सर्व्हर डाउन हा प्रकार नियमित झाला असून याविषयी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. कमी मनुष्यबळ असल्याने नागरिकांना आवर घालणे कठीण होत असून त्यांनी स्वयंशिस्तीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
-औदुंबर लाटे, दुय्यम निबंधक, गंगापूर
चौकट
चलन भरताना अडचणी
चलन भरतांना सर्व्हर डाऊन झाल्यास सदरील व्यवहार पूर्ण न होता, ग्राहकांचे पैसे कपात होतात. या त्रुटीमुळे त्यांना पुन्हा चलन भरावे लागते. पहिल्यांदा भरणा केलेल्या रकमेच्या परताव्याला अंदाजे दोन महिने लागतात. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खेट्या माराव्या लागतात.