सेविका-प्रकल्प अधिकाऱ्यांत ‘ड्रेसकोड’ वरुन वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 07:36 PM2018-10-23T19:36:18+5:302018-10-23T19:36:36+5:30
वाळूज महानगर : वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात मंगळवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ड्रेसकोडवरून बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांत वाद झाला. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन अंगणवाडी कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाळूज महानगर : वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात मंगळवारी आयोजित प्रशिक्षण शिबिरात ड्रेसकोडवरून बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्त्यांत वाद झाला. या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन अंगणवाडी कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प-२ गंगापूरच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्त्या व सेविकांसाठी वाळूजला दोनदिवसीय आकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून वाळूज, शेंदुरवादा व अंबेलोहळ या परिसरातील जवळपास १३० अंगणवाडी कार्यकर्त्या जमल्या होत्या. यात बालविकास प्रकल्प अधिकारी कोमल कोरे, पर्यवेक्षिका मीना पाटील, सुरेखा पाटील, प्रतिभा परदेशी, संजीवनी चंगुडे, चित्रा खोचे, मनीषा मोरे या मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या.
दरम्यान, प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी कमळापूरच्या अंगणवाडी कार्यकर्त्या सुनीता पन्हाड या ड्रेसकोडमध्ये न आल्यामुळे कोरे यांनी त्यांना सुनावले. यावरून दोघींत वाद झाला. सुनीता पन्हाड या प्रकारामुळे रक्तदाब वाढल्याने बेशुद्ध पडल्या. हा प्रकार लक्षात येताच अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला. याचवेळी भारती जाधव याही बेशुद्ध पडल्याने अंगणवाडी कार्यकर्त्या अधिकच संतप्त झाल्या.
या प्रकारानंतर सुनीता पन्हाड व भारती जाधव या दोघींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींची प्रकृती स्थिर असून पन्हाड यांना डायबेटीज व भारती जाधव यांना थॉयराईडचा आजार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कमल कोरे या कायम अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप अंगणवाडी कार्यकर्त्या व सेविकांनी केला आहे.
या प्रकरणी सुनीता पन्हाड यांनी कमल कोरे यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. यासंदर्भात कमल कोरे म्हणाल्या की, अंगणवाडी कार्यकर्त्यांना फक्त ड्रेसकोड परिधान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशिक्षण केंद्रातून कुणालाही बाहेर काढले नाही.
..........................
बजाजनगरात दोन्ही अंगणवाडी कार्यकर्त्यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जबाब घेऊन दोषी आढळल्यास प्रकल्प अधिकारी कोरे यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
- प्रसाद मिरकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद