तीळ-गुळाचे भाव वाढले, ग्राहकांचा खरेदीसाठी आखडता हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:04 AM2021-01-14T04:04:46+5:302021-01-14T04:04:46+5:30
सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी घाटनांद्रा येथील बाजारपेठेत सुवासिनींनी गर्दी केली आहे. वाण देण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत आले आहे. ...
सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी घाटनांद्रा येथील बाजारपेठेत सुवासिनींनी गर्दी केली आहे. वाण देण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत आले आहे. मात्र, याच्या किमतीदेखील यंदा वाढल्या आहेत. मार्केटमध्ये गुळाची आवक कमी असल्याने दरामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. असे उमेश चौरंगे, शांतलिंग कोठाळे यांनी सांगितले. पूर्वी प्रतिकिलो ४० ते ५० रुपये गुळाला भाव होता, तर तिळाचे दर १७० ते २०० प्रतिकिलो आहेत. गेल्या वर्षी तिळाचे भाव वीस ते तीस रुपये किलोने कमी होते. साधारण गूळ ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो मिळत असे. यंदा गुळाचा भाव पाच रुपयांनी वाढला आहे.
मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे महत्त्व असते. कोरोनामुळे यंदा सण साजरा करण्यावर मर्यादा आहेत. घरगुती कार्यक्रम होतील. दरवर्षी ऐन सणाच्या वेळीच दरवाढ होते. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडते. - संगीता देशपांडे, गृहिणी.
मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर हळूहळू वाणांची व हलव्याची मागणी वाढत आहे. यावर्षी सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा ग्राहकांनी खरेदी करताना हात आखडता घेतला आहे. - सागर जोशी, विक्रेता.
छाया : घाटनांद्रा येथील दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेले तीळ-गूळ आणि वाणाचे साहित्य. (छायाचित्र : दत्ता जोशी)