नागसेनवनात स्वायत्त विद्यापीठ स्थापन करावे
By Admin | Published: July 9, 2014 12:23 AM2014-07-09T00:23:56+5:302014-07-09T00:52:02+5:30
औरंगाबाद : नागसेनवनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विद्याशाखांचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
औरंगाबाद : नागसेनवनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विद्याशाखांचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नागसेनवनात एक स्वतंत्र स्वायत्त विद्यापीठ स्थापन करावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांनी केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती एच. एम. साळवे होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. एस. के. हिंगोले, प्राचार्य डॉ. मोहम्मद शफिक, प्राचार्य राहुल मोरे, डॉ. भदन्त एस. सत्यपाल, मुख्याध्यापिका ए. पी. गोलकोंडा, जयश्री घोबले आदींची उपस्थिती होती.
डॉ. धारूरकर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीईएसची निर्मिती केली. ही सोसायटी केवळ शैक्षणिक संस्था नव्हे तर ती शिक्षणाची एक चळवळ म्हणून पुढे आली. आजपर्यंत या सोसायटीतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन देशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. बाबासाहेबांना देशातील समस्यांची जाणीव होती. त्यासाठीच त्यांनी शिक्षणाचे हे रोपटे लावले होते. आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आगामी काळात या परिसरात स्वायत्त विद्यापीठ स्थापन व्हावे व त्यात देश- विदेशातील विद्यार्थी शिक्षण- संशोधनासाठी यावेत. हा परिसर सतत हरित राहावा, त्यासाठी दरवर्षी या परिसरात किमान १ हजार झाडे लावावीत.
अध्यक्षीय समारोप करताना माजी न्यायमूर्ती साळवे म्हणाले की, आपण फक्त बोलतो, कृती मात्र करीत नाहीत. त्यामुळे संघटित होऊन बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हिंगोले यांनी केले. सूत्रसंचालन दीक्षा काळे हिने केले. प्रा. व्ही. एन. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात पीईएसमधील सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.