चातुर्मास कलश स्थापना
By Admin | Published: July 23, 2016 12:33 AM2016-07-23T00:33:14+5:302016-07-23T01:18:57+5:30
औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला.
औरंगाबाद : राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेकडो भाविकांच्या साक्षीने चातुर्मास कलश स्थापन करण्यात आला. यावेळी आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचा २६ वा दीक्षा दिवस महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी सर्वप्रथम राजाबाजार जैन मंदिरातून दुपारी १ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ सान्निध्यात चातुर्मास कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. अग्रसेन भवन चातुर्मास कलश स्थापनेचा मान डॉ.रमेश बडजाते परिवाराला मिळाला. तर धर्मतीर्थ कलश स्थापनेचा मान शिखरचंद अजमेरा परिवाराला मिळाला. तीर्थरक्षा कलश स्थापनेचा मान कैलासचंद कासलीवाल परिवाराला मिळाला. यानंतर आचार्यश्रींना दीक्षा दिवसानिमित्त पिंछी, कमंडल व शास्त्र प्रदान करण्याचा मान जयपूर येथील दीक्षांत हाडा परिवाराला मिळाला. आचार्यश्रींचे पादप्रक्षालन चिरंजीलाल बजाज परिवाराने केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध महिला मंडळ, युवा मंडळ, पाठशाळेने सांस्कृतिक कार्यक्रमाने मने जिंकली. यशस्वीतेसाठी चातुर्मास समितीचे अध्यक्ष ललित पाटणी, अशोक अजमेरा, डॉ.रमेश बडजाते, एम. आर. बडजाते, दिलीप कासलीवाल, चांदमल चांदीवाल, महावीर पाटणी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
\भ्रूणहत्या करणारे मोठे राक्षस
औरंगाबाद : भ्रूणहत्या करणारे, हुंड्याचे लोभ असणारे सर्वात मोठे राक्षस आहेत, ते कधीही देवीचे उपासक बनू शकत नाही, असे परखड मत राष्ट्रसंत कमलमुनि कमलेश यांनी येथे व्यक्त केले.
वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने महावीर भवन येथे सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनात ते भाविकांना मार्गदर्शन करीत होते.
महाराज पुढे म्हणाले की, जो व्यक्ती आई, बहीण, पत्नीला त्रास देतो आणि मंदिरात जाऊन देवीची आरती करण्याचे ढोंग करतो, तो स्वत:च्या आत्म्याला व परमात्म्याला धोका देत आहे. त्यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही.
सर्व धर्माच्या लोकांनी मिळून स्त्रियांच्या रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी विश्वशांती कल्याणासाठी णमोकार महामंत्राच्या कलशाचे लोकार्पण करण्यात आले. हा कलश चातुर्मास काळात प्रत्येक भाविकाच्या घरोघरी जाणार आहे. हा कलश संस्कार, क्रांती, संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे, असे यावेळी महाराजांनी सांगितले.