सुरेश धस यांच्यावरील गुन्ह्यात सात आरोपपत्रे दाखल, तपास अधिकाऱ्यांची हायकोर्टात माहिती
By प्रभुदास पाटोळे | Published: April 20, 2024 11:54 AM2024-04-20T11:54:25+5:302024-04-20T11:55:01+5:30
बेकायदेशीररीत्या मंदिर, मशीद जमीन हस्तांतरण प्रकरण
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील बेकायदेशीररीत्या मंदिर व मज्जिद जमीन हस्तांतरण प्रकरणात माजी मंत्री सुरेश धस व इतरांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सात आरोपपत्रे दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये सादर केली.
बीड जिल्ह्यातील विशेषतः आष्टी येथील अनेक देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केल्यासंदर्भात राम खाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये सुरेश धस व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर व इतर आरोपींच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होता. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर गुन्हा दाखल झाला. सदरील गुन्हा दाखल होऊन जवळजवळ १६ महिने झाले असून, सदरील प्रकरणात संथ गतीने तपास चालू आहे. सदरील तपास उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावा अशी याचिका राम खाडे यांनी ॲड. नरसिंह जाधव यांच्यामार्फत दाखल केलेली आहे.
सदरील याचिकेची सुनावणी १५ एप्रिल रोजी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश स. पाटील व न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांच्यापुढे झाली असता सदरील गुन्ह्यामध्ये तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाला सदरील प्रकरणात सात आरोपपत्रे दाखल झाली. अद्याप एक आरोपपत्र दाखल करायचे राहिले असून ते परवानगीसाठी प्रलंबित आहे. मुख्य सरकारी वकील ए. बी. गिरासे यांनी सविस्तर माहिती देण्यासाठी वेळ मागून घेतली. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ३ मे रोजी ठेवली आहे.