आकांक्षा देशमुखच्या मारेकऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:26 PM2018-12-20T12:26:57+5:302018-12-20T12:27:23+5:30
तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली.
औरंगाबाद : डॉ. आकांक्षा देशमुखचा मारेकरी राहुल शर्मा यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांच्यासमोर बुधवारी (दि.१९) हजर केले असता, त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख या विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या आरोपात राहुल सुरेंद्र शर्मा यास सिडको पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवारी दुपारी रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आकांक्षाचा खून करण्याचा नेमका उद्देश काय होता, त्याने चोरलेली सोन्याची चेन हस्तगत करायची आहे, यासह अन्य तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करून राहुल शर्माला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
वाराणसी ते मुंबई महानगर एक्स्प्रेसमधून पकडून आणलेला आरोपी राहुल सुरेंद्र शर्मा (२६, रा. दुधी, पोस्ट डुमरडोहा, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला १८ डिसेंबर रोजी रात्री ९वाजता अटक दाखविण्यात आली. बुधवारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील अॅड. सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये
आकांक्षा देशमुख हिची हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये, अशी मागणी मनसेने एका निवेदनाद्वारे जिल्हा वकील महासंघाकडे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, सतनामसिंग गुलाटी, राजू जावळीकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, प्रवीण मोहिते, निनाद खोचे, किरण जोगदंडे यांची नावे आहेत.