विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांकरिता निवडणूक रिंगणात सात जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 01:24 PM2021-02-01T13:24:16+5:302021-02-01T13:26:12+5:30
""Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad व्यवस्थापन परिषदेच्या एक पुरुष व एक महिला, अशा दोन सदस्यांसाठी रिक्त जागा असून, यासाठी ही निवडणूक होणार आहे.
औरंगाबाद : विद्या परिषद सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांकरिता दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी पुरुष गटातून सहा, तर महिला गटातून एकाच महिला उमेदवाराचा अर्ज सादर झाला. त्यामुळे महिला गटाच्या एका जागेसाठी बिनविरोध निवडणूक आता अटळ आहे.
व्यवस्थापन परिषदेच्या एक पुरुष व एक महिला, अशा दोन सदस्यांसाठी रिक्त जागा असून, यासाठी ही निवडणूक होणार आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. यासाठी विद्यापीठाकडे पुरुष गटातून डॉ. विलास खंदारे, डॉ. ई. आर. मार्टीन, डॉ. दादासाहेब गजहंस, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. एस. ए. घुमरे, डॉ. किशोर साळवे यांनी, तर महिला गटातून डॉ. प्रतिभा अहिरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार विद्या परिषदेवर निवडून आलेला उमेदवारच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदावर निवडून जाऊ शकतो. मात्र, विद्या परिषदेमध्ये विद्यापीठ विकासमंचचे बहुमत असताना या मंचला या निवडणुकीत उमेदवार मिळू शकला नाही. दुसरीकडे, डॉ. विलास खंदारे व डॉ. प्रतिभा अहिरे हे दोन्ही उमेदवार विद्यापीठ उत्कृष पॅनलचे मानले जातात. विद्या परिषदेवर निवडून गेलेल्या उमेदवारांपैकी डॉ. जितेंद्र अहिरराव हे मंचचे पुरस्कृर्ते मानले जात असताना. मात्र, त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करणाऱ्या पुरुष गटातील सहा उमेदवारांपैकी डॉ. खंदारे सोडले, तर अन्य पाच उमेदवार हे विद्या परिषदेवर नामांकनाद्वारे नियुक्त सदस्य आहेत. त्यामुळे छाननीमध्ये त्यांचे अर्ज टिकतात की बाद होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.