छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सव्वासातशे अंगणवाड्यांना हव्यात स्वत:च्या इमारती

By विजय सरवदे | Published: February 15, 2024 11:00 AM2024-02-15T11:00:11+5:302024-02-15T11:01:14+5:30

अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत हवी, यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

Seven hundred Anganwadis in Chhatrapati Sambhajinagar district need their own buildings | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सव्वासातशे अंगणवाड्यांना हव्यात स्वत:च्या इमारती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सव्वासातशे अंगणवाड्यांना हव्यात स्वत:च्या इमारती

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार अंगणवाड्या असून, यापैकी स्वत:ची इमारत नसलेल्या ७२५ अंगणवाड्यांचे कामकाज कुठे समाजमंदिरांत, शाळाखोल्यांत, भाड्याच्या खोल्यांत, तर काही समुदाय पंचायत कार्यालयांत चालते. शासनाने अशा अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी हातभार लावण्याचे सोडून स्मार्ट अंगणवाडी, डिजिटल अंगणवाड्यांचे प्रयोग सुरू केले आहेत. 

अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके, स्तनदा माता, गरोदर माता यांना पोषण आहार, कुपोषण निर्मूलन, पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. अंगणवाड्यांना नळाचे स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधा पुरविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच डिजिटल अंगणवाडी, आदर्श अंगणवाडी यासारखे प्रयोग केले जात आहेत. मात्र, अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत हवी, यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. पूर्वी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी शासनाकडून दरवर्षी निधीची तरतूद केली जात होती, पण मागील दोन वर्षांपासून बांधकामाचे लेखाशीर्षच बंद करण्यात आले. त्यामुळे अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामाची प्रक्रिया खोळंबली आहे. 

महिला व बालविकास विभागासाठी शासनाकडून ३ टक्के निधीची तरतूद केली जाते. या निधीतून राज्य सरकारचा जिल्हा महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जि.प.चा महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येकी १ टक्का निधी मिळतो. त्यानुसार जि.प.ला मिळणाऱ्या ५ कोटी १५ लाखांच्या निधीतून जवळपास ४५ अंगणवाड्यांसाठी इमारतीची बांधकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. हा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणार असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून मार्चअखेरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित करून बांधकाम नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

जि. प.चा प्रस्ताव लालफितीत अडकला
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ७२३ अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ८३.६४ कोटी आणि ११२० अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठी ९.८५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, पाच महिने झाले तरी अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही.

अंगणवाडी इमारतींची सद्य:स्थिती
तालुका- एकूण अंगणवाड्या- इमारत असलेल्या- इमारत नसलेल्या

छत्रपती संभाजीनगर- ४७४- ३७८- ९६
फुलंब्री- २७४- २११- ६३
सिल्लोड- ४९३- ३९७- ९६
सोयगाव- १५०- १२६- २४
कन्नड- ५२३- ४३५- ८८
खुलताबाद- १७३- १४०- ३३
गंगापूर- ४८४-३३८-१४६
वैजापूर- ३९१- २९३- ९८
पैठण- ४६२- ३८१- ८१

Web Title: Seven hundred Anganwadis in Chhatrapati Sambhajinagar district need their own buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.