सात महिन्यांपूर्वी पळालेली दोन प्रेमी युगुले ताब्यात
By Admin | Published: July 10, 2017 12:34 AM2017-07-10T00:34:26+5:302017-07-10T00:37:22+5:30
पाटोदा : सात महिन्यांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : सात महिन्यांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बीड येथील प्रादेशिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अथक परिश्रम घेत चौघांना पनवेल येथे पकडून पाटोदा पोलिसांच्या ताब्यात दिले.
तालुक्यातील सौताडा येथे घडलेल्या या प्रकरणातील दोन मुली चुलत बहिणी आहेत. यातील एक तरुणही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
सौताडा येथील उमेश दादाहरी मस्के (वय २०) आणि एका अल्पवयीन मुलाने गावातीलच दोन अल्पवयीन चुलत बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी तक्रारीवरून १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी या सैराटांना पकडण्यासाठी मुंबईपर्यंत तपास केला. मात्र, उमेश आणि त्याच्या चुलतभावाने भ्रमणध्वनीतील ‘सीम कार्ड’ बदलल्यामुळे अडथळे निर्माण झाले. शिवाय बदललेल्या सीमवरून ही मुले गावातील लोकांशी संपर्कात होती. पोलीस तपासाची माहिती मस्के बंधू मिळवत होते. त्यानुसार सहा महिने पोलिसांना गुंगारा देण्यात ते यशस्वी झाले.
अखेर प्रकरणाचा तपास प्रादेशिक अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाकडे देण्यात आला. पथक प्रमुख उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या पथकाने सखोल माहिती मिळवत मुंबईच्या पनवेल भागात सापळा लावून सैराटांना ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले. उपनिरीक्षक सुधीर खारगे अधिक तपास करत आहेत.