सात निलंबित अभियंते पुन्हा कामावर
By Admin | Published: June 14, 2016 11:33 PM2016-06-14T23:33:30+5:302016-06-14T23:59:17+5:30
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत महिनाभरापूर्वी तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्या सातही अभियंत्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचा निर्णय झाला आहे.
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत महिनाभरापूर्वी तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्या सातही अभियंत्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत या सर्वांना कामावर घेण्यात येणार आहे. दंड म्हणून या सातही अभियंत्यांची एकेक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांनी महिनाभरापूर्वी औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील वीज चोरी, वीज गळती आणि थकबाकीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी वीज गळती आणि थकबाकीसाठी जबाबदार धरून ७ अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यांच्या या आदेशाची लगेचच अंमलबजावणीही झाली. तडकाफडकी झालेल्या या कारवाईमुळे महावितरण कंपनीत खळबळ उडाली होती. या सात अभियंत्यांसोबतच औरंगाबाद शहर विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळ यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नंतर आठवडाभरातच त्यांची इतरत्र बदली करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेले सर्व अभियंते हे मागास प्रवर्गातील होते. त्यामुळे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने या कारवाईचा निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर आता महिनाभरानंतर सर्व सातही निलंबित अभियंत्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय झाला आहे.
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनीही निलंबित अभियंत्यांना रुजू करून घेण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंड म्हणून सर्व सातही जणांची एकेक वेतनवाढ रोखण्यात आली असून, त्यांना येत्या दोन दिवसांतच रुजू करून घेण्यात येणार आहे, असेही गणेशकर म्हणाले. या अभियंत्यांमध्ये छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मेश्राम, सहायक अभियंता रवींद्र मोरे, सोयगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता रणधीर खंडागळे, पिशोर उपविभागांतर्गत नागद शाखेचे उपअभियंता निर्मळे, तुर्काबाद खराडी शाखेचे (गंगापूर उपविभाग) सोनवणे, जालना जिल्ह्यातील घनसावंगी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत आणि कुंभारीपिंपळगावचे सहायक अभियंता नामदेव केंद्रे यांचा समावेश
होता.