औरंगाबाद शहरातील साडेपाच हजार विद्युत मीटर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:34 AM2018-02-22T00:34:17+5:302018-02-22T00:34:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ५ हजार ५७९ ग्राहकांचे विद्युत मीटर काढून घेऊन ते जप्त करण्यात आलेले आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत औरंगाबाद शहर मंडळामध्ये १ हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेले घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची संख्या ६५ हजार ६१० एवढी असून, त्यांच्याकडे ७८ कोटी २१ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. शहराच्या विविध उपविभागात महावितरण कंपनीने थकबाकी ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसाठी १ फेब्रुवारीपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसुलीसोबत थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करणे, विद्युत मीटर जप्त करून सदरील ग्राहकाचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याची मोहीम राबविली जात आहे. ज्या उपविभागात वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे, अशा उपविभागाच्या अधिकाºयांना मार्चअखेरपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील उपविभागासाठी १३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत ३९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाºया अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांना सातत्याने सूचना दिल्यानंतरही वीज बिल न भरणाºया ग्राहकांचे विद्युत मीटर जप्त करण्यात आले आहे. यामध्ये छावणी-२०१९, पॉवरहाऊस- ४०९, शहागंज-१७५१, सिडको- १०६, चिकलठाणा-७४३, गारखेडा-२७३, क्रांतीचौक-२५२ असे एकूण ५ हजार ५७९ मीटर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेला मान्यता
विद्युत मीटर, इन्सुलेटर आणि ट्रान्स्फार्मरची तपासणी करण्यासाठी महावितरणकडे औरंगाबादेत प्रयोगशाळा आहे. मात्र, राज्यात महावितरणच्या कोणत्याही परिमंडळ कार्यालयाकडे कंडक्टर (विद्युत वाहक तारेची) गुणवत्ता चाचणी करण्याची प्रयोगशाळा नाही. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. कंडक्टर टेस्टिंगसाठी प्रयोगशाळा असलेले औरंगाबाद परिमंडळ हे राज्यात पहिले परिमंडळ कार्यालय असेल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.