कोण निश्चित, कोणाला फटका? मंत्रीपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग, मराठवाड्याला किती मंत्रिपदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 03:17 PM2024-12-06T15:17:36+5:302024-12-06T15:18:05+5:30
मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी, भाजपकडून सर्वाधिक इच्छुक
छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी शपथ घेतली असताना मंत्रिमंडळाचा विस्तार ११ डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, विस्तारात स्थान मिळावे म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्हयांतून महायुतीमधील अनेक जण इच्छुक असले तरी किमान सात ते आठ मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यातून २० ते २१जण इच्छुक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतली. आता प्रत्येक इच्छुक आपली फिल्डिंग लावणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तार ११ डिसेंबरला होतो की आणखी पुढे लांबतो, याकडेही आमदारांचे लक्ष आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून किमान दोन आणि अधिकाधिक तीन मंत्रिपदे अपेक्षित आहेत. जिल्हयातून अतुल सावे, प्रशांत बंब (दोघे भाजप), संजय शिरसाट, अब्दुल सत्तार (दोघे, शिंदेसेना) यांना मंत्रिपदे अपेक्षित आहेत. शिंदेसेनेच्या वाट्याला राज्यात ११ ते १२ मंत्रिपदे येणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातही केवळ एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडूनही एकालाच संधी मिळेल, असे दिसते.
जालना जिल्हयात अर्जुन खोतकर (शिंदेसेना), बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे (तिन्ही भाजप) हे इच्छुक आहेत. जिल्हयातून कुणाला संधी मिळेल की नाही, याची स्पष्टता येत नाही. मंत्रिपद मिळाल्यास केवळ एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. जातीपातीच्या गणितात जो आमदार बसेल, त्याला संधी मिळेल, असे चित्र आहे.
परभणी जिल्हयातून जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर इच्छुक आहेत. रासपचे रत्नाकर गुट्टेही प्रयत्नशील आहेत. मागील दहा वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा जिल्हयाला मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे.
हिंगोली जिल्हयातून भाजपचे तानाजी मुटकुळे यांना २०१९ मध्येच मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावेळी सरकारच आले नाही. यंदा त्यांना मंत्रिपदाची मोठी अपेक्षा आहे.
नांदेड जिल्हयातून हेमंत पाटील (विधान परिषद सदस्य- शिंदेसेना), तुषार राठोड यांना अपेक्षा आहे. आदिवासी समाजातील चेहरा द्यायचा झाल्यास भीमराव केराम (भाजप) यांचेही समोर येत आहे शिवाय पहिल्यांदाच निवडून आलेल्या श्रीजया अशोकराव चव्हाण (भाजप) यांच्या नावाचीही चर्चा आहे.
लातूर जिल्हयातून महायुतीचे पाच आमदार निवडून आले आहेत आणि पाचही जणांना मंत्रिपद हवे आहे. मागील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे कॅबिनेट मंत्री होते. यंदा अहमदपूरहून निवडून आलेले राष्ट्रवादी (अप) चे बाबासाहेब पाटील हेदेखील मंत्रिपद न मिळाल्यास नाराज होणार आहेत. त्यामुळे त्यांचाही विचार करावा लागणार आहे. भाजपकडून संभाजी पाटील-निलंगेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार यांचे नाव चर्चेत आहे. रमेश कराडही इच्छुक आहेत. रमेश कराड यांचे नाव पुढे आल्यास बीडमधून पंकजा मुंडे यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
धाराशिवमधून राणा जगजितसिंह पाटील (भाजप) हे यावेळी प्रबळ दावेदार आहेत. त्याचबरोबर तानाजी सावंत (शिंदेसेना) यांना मंत्रिपदाची पुन्हा एकदा अपेक्षा आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद निश्चित
बीड जिल्हयातून धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद निश्चित आहे. त्यांच्यासोबतच पंकजा मुंडे (विधान परिषद सदस्य- भाजप) आणि सुरेश धस (भाजप) यांच्या नावाची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद निश्चित असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील इतरांना संधी नाही. पंकजा मुंडे यांच्यावर भाजप किती विश्वास दाखविते आणि एकाच घरात भाऊ आणि बहिणीला मंत्रिपद द्यावे की नाही, हा मुद्दा पंकजा यांच्या विरोधात जात आहे. मात्र, वंजारी समाजाचा भाजपवर असणारा राग शांत करण्यासाठी पंकजा यांचे नाव पुढे येऊ शकते. धस यांचीही लाॅटरी लागू शकते.
दोघांना फटका बसण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी तसेच वायफळ बडबड करणाऱ्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागता कामा नये, असे वातावरण भाजपकडून तयार करण्यात आले आहे. भाजप त्याबाबत आग्रही राहील. असे झाल्यास त्याचा फटका शिंदेसेनेच्या मराठवाड्यातील दोन माजी मंत्र्यांना बसू शकतो.