अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास ७ वर्षे सक्तमजुरी
By Admin | Published: July 15, 2015 12:32 AM2015-07-15T00:32:57+5:302015-07-15T00:46:56+5:30
औरंगाबाद : मावशीचा गुरुभाऊ असलेला विकास रमेश राजपूत याने सुरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर अपहरण करून वर्षभर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध
औरंगाबाद : मावशीचा गुरुभाऊ असलेला विकास रमेश राजपूत याने सुरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर अपहरण करून वर्षभर बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. शिंदे यांनी त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पतीला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने तिलादेखील न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
सुरेवाडी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीचा गुरुभाऊ विकास राजपूत याने १७ जुलै २०१२ रोजी घरात घुसून बलात्कार केला. आई, भाऊ व वडिलास जिवे मारण्याची धमकी देत तिला गप्प केले. धमकी देत त्यानंतर वर्षभर तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. एक दिवस विकासने तिला संभाजीपेठेतील त्याच्या घरी सोन्याचा ऐवज घेऊन बोलावले. न आल्यास मी काय करू शकतो हे तुला माहीत आहे, असेही धमकावले. धास्तावलेल्या मुलीने घरातून सुवर्णालंकार घेऊन पळ काढला आणि विकासच्या दुचाकीवर बसून ती त्याच्या घरी गेली. रात्रभर जटवाडा येथील विकासच्या घरात ती थांबली. २७ जून २०१२ रोजी पहाटे विकासने त्याची पत्नी कल्पनासोबत तिला मध्य प्रदेशातील सोनतलाव येथे पाठविले.
दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपास अधिकारी तडवी यांना राजपूत याने मुलीस पळवून नेल्याची माहिती मिळाली. तडवी यांनी याचा माग काढत शिरपूर येथून विकास त्याची पत्नी कल्पना व मुलीला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. शिंदे यांच्यासमोर झाली. अतिरिक्त लोकअभियोक्ता कैलास पवार यांनी सहा साक्षीदार तपासले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विकासचा मामा व तरुणी हे दोघे फितूर झाले होते. असे असतानाही पुराव्याआधारे मुलीचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले. विकासला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी कल्पनाला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद सुनावली. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विकासला ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. दंडापोटी जमा होणाऱ्या रकमेतून सदर मुलीला २० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.