प्रदूषण नियंत्रण मंडळ पथकाने घेतले सांडपाण्याचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:39 PM2018-12-27T18:39:57+5:302018-12-27T18:40:11+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी वसाहतीला भेट देवून सांडपाणी व मातीचे नमुने घेतले.
वाळूज महानगर : सिडको परिसरातील नागरी वसाहतीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी वसाहतीला भेट देवून सांडपाणी व मातीचे नमुने घेतले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिडको वाळूज महानगरातील गट नंब ४७ व ४८ च्या मधून सांडपाणी वाहून जाणारा नैसर्गिक नाला असून, दोन्ही बाजूला नागरी वसाहती आहेत. लगतच्या नागरी वसाहतीचे ड्रेनेज व सांडपाणी याच नाल्यात सोडले जाते. ही संधी साधून औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी काही दिवसांपासून चेम्बरमध्ये सोडले जात आहे.
परिणामी परिसरात दुर्गंधी वाढून डासांचा प्रादूर्भाव वाढला. रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा आरोप करुन येथील नागेश कुठारे, प्रभाकर धोत्रे, सुनिल साळुंके, दिनानाथ राठोड, कृष्णा नागे आदी नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे तक्रार करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. लोकमतने घातक रसायनयुक्त सांडपाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट या मथळ्याखाली रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे वृत्त प्रकाशित करुन सिडकोसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते.
सिडकोच्या अधिकाºयांनही पाहणी केली होती. सिडकोने सांडपाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. तसेच याची तक्रारही केली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी दुपारी वसाहतीला भेट देऊन चेंबरची पाहणी केली. यावेळी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी पथकाकडे केली. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी डॉ. गजानन खडकीकर व सीईटीपीचे अधिकारी जालिंदर वाघ यांनी येथील चेंबरमधील पाण्याचे व नाल्यातील मातीचे नमुने घेतले. याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करुन उपाययोजना करण्यात येईल. असे डॉ. खडकीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.