स्पामधील सेक्स रॅकेट प्रकरण : त्या ‘थाई’ मुलींचे ३ महिन्यांपासून वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:23 AM2017-12-10T00:23:18+5:302017-12-10T00:23:24+5:30
प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालणा-या सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या ९ मुलींचे तीन महिन्यांपासून शहरात बेकायदा वास्तव्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये चालणा-या सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या ९ मुलींचे तीन महिन्यांपासून शहरात बेकायदा वास्तव्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे विदेशी तरुणी तीन महिन्यांपासून शहरात राहतात आणि आपल्या गुप्तचर यंत्रणेला याची कोणतीही खबर लागू नये, हे तर त्याहून अधिक धक्कादायक आहे.
प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या पथकाने धाड मारून पर्दाफाश केला. त्यावेळी तेथे थायलंडमधून आणण्यात आलेल्या ९ मुली आढळल्या.
टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या या मुलींचे साधारणत: तीन महिन्यांपासून औरंगाबादेत बेकायदा वास्तव्य होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. टुरिस्ट व्हिसावर आलेल्या विदेशी नागरिकांना पोलिसांच्या विदेशी नागरिक (फॉरेनर) शाखेत जाऊन नोंदणी करणे आवश्यक असते; मात्र यापैकी एकाही मुलीने त्यांच्या शहरातील वास्तव्याची माहिती पोलिसांना दिली नाही. पोलिसांकडे नोंदणी केल्यानंतर ते किती दिवस शहरात राहणार आहेत. कोठे मुक्कामी आहेत आणि कोणत्या पर्यटन स्थळाला भेटी देणार आहेत, याबाबतची माहिती त्यांना पोलिसांना द्यावी लागते. छुप्या मार्गाने चालणाºया सेक्स रॅॅकेटमध्ये काम करण्यासाठी त्या आल्याने त्यांनी पोलिसांकडे नोंदणी केली नाही आणि त्यांना येथे आणणाºया शशांक खन्ना यानेही ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली.
खन्नाने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये होते त्यांचे वास्तव्य
स्पा चा मॅनेजर खन्ना यानेच या मुलींना थायलंडमधून आणल्याचे समोर आले. त्यानेच सिडको एन-१ मधील एका अपार्टमेंटमधील पाच रूमचा फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे त्यांना ठेवले होते.
विशेष म्हणजे त्यांच्यासोबत तोही तेथे राहत असे. प्रोझोन मॉलसमोर आणि अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये विदेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली नाही.
गुप्तचर यंत्रणा गाफील
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. येथे नियमित विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. शहराच्या आणि प्रोझोन मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी ९ विदेशी मुली स्पा च्या नावाखाली घाणेरडा व्यवसाय करतात आणि मॉलपासून हाकेच्या अंतरावर सुमारे तीन महिन्यांपासून राहतात, याविषयी कोणतीही माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला लागत नाही, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आहे.