सोशल मीडियातून ओळख झालेल्या मैत्रिणीचे चार्ली पोलिसाने केले लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:29 PM2018-04-28T18:29:18+5:302018-04-28T18:31:56+5:30
तरुणीच्या कपाळाला कुंकू लावून आणि बेंटेक्सचे मंगळसूत्र घालून चक्क सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या चार्ली पोलीस कॉन्स्टेबलने नातेवाईकांसमोर लग्नास नकार दिल्याने पीडितेने त्याच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद : तरुणीच्या कपाळाला कुंकू लावून आणि बेंटेक्सचे मंगळसूत्र घालून चक्क सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या चार्ली पोलीस कॉन्स्टेबलने नातेवाईकांसमोर लग्नास नकार दिल्याने पीडितेने त्याच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला. आरोपी पोलीस कर्मचारी पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना ३० जून २०१७ ते २१ जानेवारीदरम्यान भोईवाडा येथे घडली.
अमोल शिवाजी सोनटक्के (रा. भोईवाडा) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. सिटीचौक परिसरात राहणारी तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात विधि शाखेचे शिक्षण घेत आहे. या तरुणीसोबत आरोपीची गतवर्षी ओळख झाली. त्यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला सतत फोन करून, मेसेज पाठवून त्याने तिच्याशी जवळीक वाढविली. दोघेही भिन्न जातीचे असल्याचे त्याला माहीत असूनही त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तो तिच्याशिवाय राहूच शकत नाही, असे तो तिला दाखवायचा. आपल्यावर प्रेम करणारा तरुण पोलीस कर्मचारी असून, तो कायद्याचा रक्षक असल्याने त्याच्याकडून आपल्याला धोका मिळणार नाही, असे तिचे ठाम मत होते. तो तिला सतत लग्नाचे आमिष दाखवायचा. एवढेच नव्हे तर गतवर्षी जून महिन्यात आरोपीने तिच्या कपाळाला कुंकू लावले आणि बेंटेक्सचे मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घातले. तिने लग्नाचा विषय छेडताच तो तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागला. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाला नकार दिला आणि तिच्याशी कायमस्वरूपी संबंध तोडले. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले आणि ज्याला आपण सर्वस्व दिले, त्यानेच आपली फसवणूक केल्याचे पीडितेच्या लक्षात येताच, तिने २६ एप्रिल रोजी सिटीचौक ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस निरीक्षक जानकर तपास करीत आहेत.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते
तेव्हापासून सिटीचौक परिसरातील एका ठिकाणी घर भाड्याने घेऊन दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती-पत्नीसारखे राहू लागले. ३० जून २०१७ ते २१ जानेवारी या कालावधीत आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सर्व समाज आणि नातेवाईकांसमोर लग्न करण्यासाठी ती त्याच्याकडे सतत आग्रह करू लागली. तो विविध कारणे सांगून लग्न करण्याचे टाळू लागला.