लग्नाच्या आमिषाने विधवेशी शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत, पीडितेची तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार
By बापू सोळुंके | Published: May 7, 2023 02:53 PM2023-05-07T14:53:46+5:302023-05-07T14:54:33+5:30
Crime News: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल अडिच वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दुसरीसोबत लग्न करणाऱ्या तरूणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला.
- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर - इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल अडिच वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दुसरीसोबत लग्न करणाऱ्या तरूणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरेापीचा शोध सुरू केला आहे.
शोएब शेख बाबू (२४,रा. नारेगाव )असे आरोपीचे नाव आहे. याघटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील रहिवासी २७ वर्षीय विधवा पिडिता दोन मुलांसह राहते. इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर दोघांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री होऊन भेटीगाठी झाल्या. तेव्हा शोएबने तिच्यासोबत लग्न करून तिच्या दोन्ही मुलांना आधार देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. गेल्या काही दिवसांपासून तो तिला भेटत नव्हता. एवढेच नव्हे तर तो तिचे फोनही घेत नव्हता. शोएब तिच्यापेक्षा वयाने चार वर्ष लहान आहे. यामुळे त्याची अडचण काय आहे, समजून घेण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. मात्र त्याने तिच्याशी संपर्क तोडल्याचे वागणे तिला खटकल्याने तिने त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याने नुकताच दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केल्याचे तक्रारदार यांना समजले. आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी ६ मे रोजी सिडको पोलीस ठाण्यात शोएबविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.