शिक्षकांच्या बदल्यात सावळा गोंधळ
By Admin | Published: June 5, 2016 11:55 PM2016-06-05T23:55:43+5:302016-06-06T00:28:38+5:30
मााजलगाव : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सहशिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु आहे. पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी शनिवारी
मााजलगाव : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सहशिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरु आहे. पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी शनिवारी बोर्डावर लावणे आवश्यक असताना ती ऐनवेळी म्हणजेच रविवारी लावण्यात आली. त्यामुळे सदरील कार्यालयाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. रविवार हा बदली प्रक्रियेचा अंतिम दिवस होता. यामध्ये घोडेबाजार झाला असल्याचा संशय शिक्षकांनी व्यक्त केला.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत २३४ शाळा असून या शाळांमध्ये ७९१ शिक्षक कार्यरत आहेत. यातील १० टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्याचे काम सुरू आहे. त्यात ६९ सहशिक्षक व १२ पदवीधर शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू असून या बदली प्रक्रि येचा रविवारी अंतिम दिवस होता. बदल्या करण्यापूर्र्वी २४ तास अगोदर म्हणजेच शनिवारी बदलीस पात्र शिक्षकांची यादी जाहीर करणे आवश्यक होते. तसे न होता रविवारी सकाळी १० वा. याद्या नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. बदली झालेल्या शिक्षकांना आक्षेप नोंदविता आला नाही. आक्षेप नोंदविण्यास कोणताही वेळ दिला नसल्यामुळे आर्थिक तडजोडीतून याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत काय? असा सवाल अनेक शिक्षकांनी उपस्थित केला.
पती-पत्नी एकत्रिकरण हा शासन नियम डावलून बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह बाबींमुळे प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दुरुस्त करावी, शिक्षकांचे आक्षेप नोंदवून घ्यावेत, फेरी यादीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली. याविषयी प्रभारी गटशिक्षणाधिकारी व्ही.आर. महामुनी म्हणाले, शासन नियमाप्रमाणे बदल्या होत आहेत. कोणाच्याही दबावाखाली होत नाहीत. (वार्ताहर)
जिल्हास्तरावरील कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी नसलेले तसेच प्रोसेसिंगला नोंद नसलेल्या काही व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर करून बदली प्रक्रि या ‘हायजॅक’ करण्याचा आरोप अनेक शिक्षक करत आहेत.