‘शालीवाहन पतसंस्थेने सामाजिक दायित्व जपले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:03 AM2021-09-15T04:03:27+5:302021-09-15T04:03:27+5:30
पैठण : व्यावहारिक देणे-घेणे करत असताना सामाजिक दायित्वाचे देणेही महत्त्वाचे मानून ते जपले आहे. हे शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेने ...
पैठण : व्यावहारिक देणे-घेणे करत असताना सामाजिक दायित्वाचे देणेही महत्त्वाचे मानून ते जपले आहे. हे शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमातून सिद्ध झाले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केले. मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरप्रसंगी ते बोलत होते.
शालिवाहन नागरी पतसंस्था व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी १३४ दिव्यांग महिला-पुरुषांना कृत्रिम अवयव (जयपूर फूट) वितरण करण्यात आले. चेअरमन किशोर चौहान यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सूरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे, पैठणचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) अनिल पुरी, संस्थेचे सचिव प्रकाश कासलीवाल, व्हा. चेअरमन डॉ. जयंत जोशी यांची उपस्थिती होती.
जयपूर फूट मोफत वितरणाचा उपक्रम पतसंस्थेच्यावतीने दर दोन वर्षानंतर घेतला जातो. आजपावेतो चार शिबिरात शेकडो दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळाले आहेत. दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला होता. कार्यक्रम यशस्वितेसाठी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. जयंत जोशी, सचिव प्रकाश कासलीवाल, संचालक डॉ. पंडित किल्लारीकर, दीपक लखमले, बाबा राऊत, दीपक आहुजा, सुनील शेळके, ॲड. राजेंद्र गोर्डे, गणेश लोहिया, सुमन चौहान, सुमन म्हस्के, व्यवस्थापक देवीदास पूर्णपात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी परिश्रम घेतले.
140921\img-20210913-wa0081.jpg
दिव्यांग महिलेस जयपूर फूट प्रदान करताना रोहयो मंत्री संदिपान भुमरे, किशोर चौहान, नगराध्यक्ष सुरज लोळगे, दिपक आहुजा, डॉ पंडीत किल्लारीकर आदी.