राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत
By राम शिनगारे | Published: December 4, 2023 07:43 PM2023-12-04T19:43:11+5:302023-12-04T19:44:18+5:30
श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला.
कविवर्य ना.धों. महानोर साहित्यनगरी, गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचळवीर निर्माण केले आहेत. परस्परांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्ये करून टोकाचा विखार निर्माण करीत सामाजिक सलोखा नष्ट करीत आहेत. अशा राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांच्या भाषेची लाज वाटते. त्याबद्दल ४३वे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपात ठराव घेऊन खंत व्यक्त करण्यात आली.
श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, त्रिंबकराव पाथरीकर, किरण सगर, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार, वैशाली बागुल, समन्वयक डॉ. गणेश मोहिते आदींची उपस्थिती हाेती. यावेळी १० ठराव मंजूर केले. त्यात शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वेमार्ग दुहेरी करून मध्य विभागाशी जोडावा, गंगापूरमध्ये वातानुकूलीत सांस्कृतिक सभागृह बांधावे, मराठवाड्याच्या हक्काचे २२ टीएमसी पाणी विनाविलंब द्यावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळावा, मराठी शाळा बंद करू नयेत आणि जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पामुळे मत्स्यमारी करणाऱ्या समूहासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात यावा, हे ठराव संमेलनात मंजूर केले. ठरावांचे वाचन प्रा. किरण सगर यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमात कौतिकाराव ठाले पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. विशाल साबणे यांनी आभार मानले.
गंगापूरमध्ये मसापची शाखा स्थापन होणार
गंगापूर शहरात साहित्य संमेलन घेण्यामागे याठिकाणी साहित्य चळवळ रुजावी हा हेतू होता. आम्ही फक्त आयोजनाचे काम केले. संमेलनातील सर्व निर्णय मसापने घेतले. आगामी काळात मसापची गंगापूर शहरात शाखा स्थापन करण्यात येईल, असे संमेलनाचे मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच संमेलनात घेतलेल्या ठरावांचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करण्यात येईल, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.