विद्यापीठ देणार शरद पवार, नितीन गडकरी यांना डि.लिट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:02 PM2022-05-28T12:02:18+5:302022-05-28T12:03:10+5:30
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर आता अधिसभेत होईल निर्णय
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी, अशाप्रकारे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन विद्यापीठाकडून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आहे. कुलगुरू डाॅ. येवले यांनी डिसेंबर २०२० मध्ये राजभवनला पत्र लिहून शरद पवार, नितीन गडकरी यांना डि.लिट देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर शुक्रवारी हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्यावर सकारात्मक निर्णय शुक्रवारी झाला. आता व्यवस्थापन परिषदेत मंजुरी व पदवीदान समारंभ आयोजनाच्या औपचारिक बाबींच्या पाठपुराव्याबाबत चर्चा झाली. अधिसभेत निर्णयाच्या औपचारिकतेनंतर शरद पवार आणि नितीन गडकरी यांना विद्यापीठाकडून मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.