शरद पवार देशाच्या आर्थिक सुधारणांचे भागीदार ; माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्याकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 05:51 PM2017-12-23T17:51:05+5:302017-12-23T17:52:25+5:30
देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार हे समान भागीदार आहेत असा गौरव माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केला. ते पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.
औरंगाबाद : देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार हे समान भागीदार आहेत असा गौरव माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केला. ते पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाच्या विमोचन प्रसंगी बोलत होते.
महात्मा गांधी मिशन तर्फे आज शेषराव चव्हाण लिखित शरद पवार यांच्यावरील ' पद्मविभूषण शरद पवार - द ग्रेट इनिगमा ' या चरित्र ग्रंथाचे डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते विमोचन झाले. यावेळी बोलताना डॉ. सिंग यांनी शरद पवार यांचे देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये उत्तम योगदान असल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार प्रभावी मंत्री
पुढे बोलताना ते म्हणाले, १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मी अर्थमंत्री असताना शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. आर्थिक सुधारणांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या बजेटमध्ये कपात करण्यास मंजुरी देणारे ते एकमेव मंत्री होते. तसेच आर्थिक सुधारणांची भूमिका त्यांनी पुणे चेंबर ऑफ कॉमर्सच्या मंचावर स्पष्ट केली आहे. पवार हे प्रभावी मंत्री होते व मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली असेही ते म्हणाले.